ऑनलाइन लोकमतबेळगाव, दि. 24 - जय महाराष्ट्र वरुन बेळगावातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. महाराष्ट्रातील शिवसेना मंत्र्यांना बेळगाव तसेच कर्नाटकात प्रवेशबंदी करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिला आहे. उद्या शिवसेने तर्फे बेळगावात मराठी मोर्चा आंदोलन होणार आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच कारण दाखवत महाराष्ट्रातील मंत्र्यांना प्रवेशबंदी केली आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि आरोग्यमंत्री दीपक सावंत यांना 24 ते 27 मे पर्यंत बेळगावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार बेळगावात उद्या होणाऱ्या मराठी मोर्चात परिवहन मंत्री दिवाकर रावते उपस्थित राहणार आहेत. जय महाराष्ट्र अशी घोषणा दिल्यास, लोकप्रतिनिधींचे पदच रद्द करण्याचा विचार कर्नाटक सरकार करत असल्याचा इशारा नगरविकासमंत्री रोशन बेग यांनी सोमवारी दिला होता. कर्नाटक सरकार आगामी अधिवेशनात कोणत्याही निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक कार्यक्रमात, सभागृहात "जय महाराष्ट्र" म्हटल्यास किंवा कर्नाटक राज्यविरोधी घोषणा दिल्यास, त्याचे पद वा सदस्यत्व रद्द करणार, असा नवीन कायदा अंमलात आणणार आहे. बेळगाव महापालिका सभागृहात याबाबत मंगळवारी बैठक घेऊन मराठी नगरसेवकांना आपण सूचना देणार असल्याचेदेखील बेग यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगावात प्रवेशबंदीचा आदेश
By admin | Updated: May 24, 2017 22:55 IST