मुंबई : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडूनही अद्याप निलंबित न झालेल्या २१० अधिका-यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिले. विशेष गंभीर बाब म्हणजे यापैकी ६० अधिकाऱ्यांना न्यायालयाने दोषी ठरवल्यावरही ते सेवेत कार्यरत होते!लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुख्यमंत्री फडणवीस यांना गृह खात्याच्या बैठकीत ही धक्कादायक माहिती दिल्यावर फडणवीस यांनी याबाबत सखेद आश्चर्य व्यक्त केले. लाचलुचपत विभागाने लाच घेताना पकडल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे प्रस्ताव सरकारकडे पाठवले होते. मात्र २१० अधिकाऱ्यांच्या निलंबनाला मागील सरकारने मान्यता दिली नाही. त्यापैकी ६० अधिकाऱ्यांची प्रकरणे न्यायालयात गेली व तेथे त्यांना शिक्षा सुनावली गेली; तरीही त्यांच्या निलंबनास मान्यता मिळाली नाही, असे निदर्शनास आल्यानंतर फडणवीस यांनी या सर्वच अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. पोलीस विभागाचे आधुनिकीकरण, रिक्त पदे, नक्षलग्रस्त भागासाठी पोलीस ठाणी आदी विषयांवर बैठकीत चर्चा झाली.(विशेष प्रतिनिधी)
२१० अधिका-यांना निलंबित करण्याचे आदेश
By admin | Updated: November 8, 2014 04:16 IST