चंद्रपुरातील बालमृत्युंच्या चौकशीचे आदेश
By Admin | Updated: July 20, 2016 05:41 IST2016-07-20T05:41:12+5:302016-07-20T05:41:12+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातील बालमृत्यूचे सत्य उघडकीस आल्यानंतर जिल्हा आरोग्य विभाग हादरला आहे.

चंद्रपुरातील बालमृत्युंच्या चौकशीचे आदेश
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील बालमृत्यूचे सत्य उघडकीस आल्यानंतर जिल्हा आरोग्य विभाग हादरला आहे. राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक यांनी नागपूर येथील आरोग्य उपसंचालकांना या बालमृत्युंची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
‘लोकमत’ने दि. १८ जुलै रोजी ‘चंद्रपुरात मेळघाटपेक्षाही अधिक बालमृत्यू’ या मथळ्याखाली वृत्त प्र्रकाशित केले होते. सौनिक यांनी त्याची दखल घेऊन नागपूर येथील आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांना ई-मेलद्वारे चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सौनिक यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्या भागात बालमृत्यू अधिक आहेत, त्याची कारणे काय, बालमृत्यू कमी करण्याकरिता कोणत्या उपाययोजना राबविल्या जात आहेत, शासकीय योजनांची स्थिती काय आदी माहिती तातडीने मागितली आहे. याशिवाय, गरोदर मातांना प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णालयांपर्यंत पोहोचविण्याकरिता १०२ वाहनांचा उपयोग केला जातो काय, अशीही विचारणा केली आहे. माहेरघर योजनेचा लाभ महिलांना व्यवस्थित दिला जातो काय, याबाबतही प्रधान सचिवांनी माहिती बोलाविली असून, चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय करून आरोग्य विभागाने बालमृत्यू नियंत्रणात आणण्यासाठी तत्काळ पावले उचलण्याचे आदेशही दिले आहेत.
चंद्रपूरचा बालमृत्युदर ३.२२
जिल्हा आरोग्य विभागानुसार, चंद्रपूर जिल्ह्यात २२ लाख ७१ हजार ६७६ लोकसंख्येत ४६५ बालमृत्यू आहेत, तर मेळघाटात केवळ दोन तालुक्यांतील २ लाख ९४ हजार १३७ लोकसंख्येमध्ये ४४६ बालमृत्यू आहेत. त्यामुळे मेळघाटच्या बालमृत्यूचे प्रमाण चंद्रपूरच्या चारपटीपेक्षा अधिक असून, जिल्ह्याचा दरहजारी बालमृत्युदर ३.३२ आहे, असेही जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.