मराठा आरक्षणाअभावी समाजात विषमता
By Admin | Updated: July 7, 2016 19:20 IST2016-07-07T19:20:35+5:302016-07-07T19:20:35+5:30
मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्याने समाजात जातीय विषमता वाढल्याचे उदगार कोल्हापूर येथील खासदार छत्रपती संभाजी महाराज भोसले यांनी काढले.

मराठा आरक्षणाअभावी समाजात विषमता
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. ७ : मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्याने समाजात जातीय विषमता वाढल्याचे उद्गार कोल्हापूर येथील खासदार छत्रपती संभाजी महाराज भोसले यांनी काढले. तथापि, आपण फक्त मराठा समाजासाठीच नव्हे, तर संपूर्ण बहुजन समाजाला एका छताखाली आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नाशिक जिल्हा मराठा समाज उत्कर्ष संस्थेच्या वतीने उभारण्यात आलेल्या उत्तमहिरा सभागृहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. महाकवी कालिदास कलामंदिरात हा कार्यक्रम झाला. भद्रकाली फ्रूट मार्केट या इमारतीत संस्थेचे नवीन कार्यालय व रुग्णोपयोगी साहित्य सेवा केंद्राचे उद्घाटनही यावेळी संभाजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या छोटेखानी भाषणात ते म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही, हे दुर्दैव आहे. त्यामुळेच समाजात जातीय विषमता वाढली. जातीय चष्म्याऐवजी प्रत्येकाकडे माणूस म्हणून पाहायला हवे. छत्रपती शिवराज, शाहू महाराजांनी फक्त मराठा समाजासाठी नव्हे, तर अठरापगड जाती व बारा बलुतेदारांसाठी स्वराज्य मिळवले व वाढवले. शाहू महाराजांनी जातिप्रथा मोडीत काढण्याचा प्रयत्न करीत मराठा बोर्डिंगमध्ये सर्व समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. आपणही केवळ मराठा समाजासाठी काम करीत नसून, संपूर्ण बहुजन समाजाला एकत्र आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान, आपल्याला मिळालेली खासदारकी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचा सन्मान असल्याचेही ते म्हणाले.