सरसंघचालकांच्या सुरक्षा जवानांना शाळा देण्यास विरोध
By Admin | Updated: July 21, 2015 00:52 IST2015-07-21T00:52:18+5:302015-07-21T00:52:18+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील सीआयएसएफ जवानांच्या निवासासाठी उंटखाना येथील

सरसंघचालकांच्या सुरक्षा जवानांना शाळा देण्यास विरोध
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील सीआयएसएफ जवानांच्या निवासासाठी उंटखाना येथील महापालिकेची डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक शाळा व ज्युनिअर कॉलेजची इमारत उपलब्ध क रण्याचा प्रस्ताव आहे. मात्र याला विरोध दर्शविण्यासाठी स्थानिकांनी सोमवारी महाल येथील मनपा कार्यालयापुढे निदर्शने करून जोरदार घोषणाबाजी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक शाळा १९५६ साली सुरू करण्यात आली. त्याच वर्षात दीक्षान्त सभारंभासाठी आलेले अनुयायी या शाळेत वास्तव्यास होते. या शाळेसोबत लोकांचे भावनिक नाते आहे. शिवाय या शाळेत ४० विद्यार्थी शिक्षण घेत असून, मोफत शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार सर्व बालकांना जवळच्या शाळेत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करणे बंधनकारक आहे.
असे असतानाही सीआयएसएफ जवानांच्या निवासासाठी ही शाळा उपलब्ध करण्याचा मनपा प्रशासनाचा विचार आहे. परंतु आम्हाला हा निर्णय मान्य नसल्याचे नगरसेविका सुजाता कोंबाडे व अॅड. रेखा बाराहाते यांनी सांगितले. सभागृहाची मंजुरी मिळण्यापूर्वीच मनपाच्या मालमत्ता विभागाने शाळा इमारत भाड्याने देण्याला सहमती दिली आहे.
या शाळेचा तळमजला व पहिला मजला अशी ४९२.६२ चौ.मी. इमारत उपलब्ध करण्याचा प्रस्ताव आहे. पाच वर्षांसाठी हा करार केला जाणार आहे. (प्रतिनिधी)