विरोधकांनी केली सरकारची कोंडी
By Admin | Updated: March 29, 2016 04:11 IST2016-03-29T03:59:13+5:302016-03-29T04:11:22+5:30
नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्याने मंत्रालयासमोर केलेली आत्महत्या, महाड येथील चवदार तळ्याच्या शुद्धीकरणाचा कथित कार्यक्रम आणि फर्ग्युसनमधील आंबेडकरी चळवळीतील विद्यार्थ्यांवर

विरोधकांनी केली सरकारची कोंडी
मुंबई : नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्याने मंत्रालयासमोर केलेली आत्महत्या, महाड येथील चवदार तळ्याच्या शुद्धीकरणाचा कथित कार्यक्रम आणि फर्ग्युसनमधील आंबेडकरी चळवळीतील विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईवरून कमालीच्या आक्रमक झालेल्या विरोधकांनी सत्ताधारी पक्षाला चांगलेच धारेवर धरले. ‘जयभीम’ म्हणणे देशद्रोह ठरणार असेल आणि
चवदार तळ्याचे शुद्धीकरण केले जात असेल तर हा तमाम आंबेडकरी जनतेचा आणि संपूर्ण समाजाचा अवमान आहे, अशा शब्दांत विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला.
शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी १९ मार्च रोजी महाडच्या चवदार तळ्याचे शुद्धीकरण करून तमाम आंबेडकरी जनतेचा व संपूर्ण समाजाचा अवमान केल्याचा आरोप करीत या प्रकरणी सरकारने माफी मागावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. तसेच मंत्रालयाच्या दारात येऊन नांदेड जिल्ह्यातील शेतकरी माधव कदम यांनी केलेली आत्महत्या सरकारसाठी लाजिरवाणी बाब असून कामकाज बाजूला सारून त्यावर चर्चेची मागणी केली. शेतकरी आत्महत्या हा स्थगन प्रस्तावाचा विषय होऊ शकत नाही, असे सांगत अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी स्थगन प्रस्ताव नाकारल्यावर विरोधक अधिकच आक्रमक झाले.
कदम यानी केलेली आत्महत्या दुर्दैवी आहे; परंतु त्यांना सरकारकडून मदत मिळाली नाही, ही पूर्णपणे चुकीचे असल्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले. कदम यांच्या नावे १ हेक्टर ९ आर. जमीन असून त्यांना नुकसानभरपाई म्हणून सरकारने ४,६०० रुपये मदत त्यांच्या खात्यावर जमा केल्याचे त्यांनी सांगितले.
कापूस पिकाबाबत सरकारचे धोरण ठरले असून याचा अंतिम निर्णय झाल्यावर उर्वरित आर्थिक मदत त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचे खडसे यांनी सांगितले. सरकारच्या या उत्तराने विरोधकांचे समाधान न झाल्याने गदारोळ सुरूच राहिला. सरकारच्या निषेधार्थ विरोधकांनी दोन वेळा सभात्याग केला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि शेकापचे ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख यांनीही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारवर आरोपांचा भडिमार केला.
गोंधळातच वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पावर गेल्या आठवडयात तीन दिवस झालेल्या चर्चेला उत्तर दिले.गोंधळातच शालेय शिक्षण,आदिवासी विकास आदी विभागांच्या अर्थसंकल्पीय अनुदान मागण्या मांडण्यात आल्या आणि त्या चर्चेशिवाय मंजूरदेखील झाल्या.
सरकारमध्ये असल्याची लाज वाटते : सेना आमदार
नांदेड जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनीही कदम यांच्या आत्महत्येवरून सरकारला धारेवर धरले. माधव कदम हा माझा कार्यकर्ता होता. त्याला तोटक्या मदतीसाठी सरकारचे उंबरठे झिजवावे लागले.
आमच्या सरकारमध्ये हे घडत आहे, असा हल्लाबोल पाटील यांनी खडसे यांच्यावर केला. हा सारा प्रकार पाहून सत्ताधारी पक्षात असल्याची लाज वाटत असल्याचा घरचा अहेर त्यांनी दिला.
महिला आमदार आक्रमक
चवदार तळे व फर्ग्युसनमधील प्रकरणावरून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आमदारांनी सोमवारी विधानसभेत आक्र मक पवित्रा घेतला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, अशी घोषणा देत जयभीम बोलणे गुन्हा आहे का, असा सवाल वर्षा गायकवाड, निर्मला गावित, अमिता चव्हाण, यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे, ज्योती कलानी यांनी यावेळी सरकारला केला.
विरोधकांचा सवाल...
राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी चवदार तळ्याच्या कथित शुद्धीकरणाचा मुद्दा उचलून धरत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह करून ज्या चवदार तळ्याचे पाणी सर्वांना खुले केले, ते पाणी शुद्धीकरण करून सत्ताधारी कोणता संदेश देऊ इच्छितात, असा सवाल त्यांनी केला.
त्यावर आपण शुद्धीकरण नव्हे तर, जलपूजन केल्याचा खुलासा शिवसेनेचे भरतशेठ गोगावले यांनी केला. जलपूजन हा सरकारचा कार्यक्रम असून आपण अधिकाऱ्यांच्या निमंत्रणावरून उपस्थित राहिलो, असे त्यांनी सांगितले.
मात्र, सरकारच्या परिपत्रकात जलपूजनाचा कुठेही उल्लेख नसल्याची बाब काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी निदर्शनास आणून दिली. जलपूजन हा सरकारी कार्यक्रम होऊच कसा शकतो, असा सवाल करत या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सभागृहात येऊन माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.
पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात आंबेडकरी विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी जयभीमचा नारा दिल्याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली जाते, हा कुठला न्याय आहे, असा सवाल विरोधकांनी केला.(प्रतिनिधी)