गुजरातमध्ये दलितांना झालेल्या मारहाणीचा संघाकडून निषेध
By Admin | Updated: July 21, 2016 14:40 IST2016-07-21T14:40:17+5:302016-07-21T14:40:17+5:30
गुजरातमधील गीर-सोमनाथ जिल्ह्यात दलित तरुणांना झालेल्या मारहाणीचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने निषेध केला आहे. सामाजिक समरसता बिघडविण्याचा हा प्रयत्न असून आरोपींना शिक्षा व्हायलाच हवी

गुजरातमध्ये दलितांना झालेल्या मारहाणीचा संघाकडून निषेध
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २१ : गुजरातमधील गीर-सोमनाथ जिल्ह्यात दलित तरुणांना झालेल्या मारहाणीचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने निषेध केला आहे. सामाजिक समरसता बिघडविण्याचा हा प्रयत्न असून आरोपींना शिक्षा व्हायलाच हवी, अशी मागणी संघाकडून करण्यात आली आहे. सामढियाला या गावात गोरक्षेच्या नावाखाली काही जणांनी दलित तरुणांना अमानुषपणे मारहाण केली होती. या घटनेचे पडसाद संपूर्ण देशात उमटत आहेत.
संघाच्या गुजरात प्रांतातर्फे या घटनेचा निषेध करणारे पत्रक जारी करण्यात आले आहे. जातीच्या आधारावर होणारा भेदभाव, अन्याय, अत्याचार यांची आम्ही निंदा करतो. उना तालुक्यात जी घटना झाली ती निषेधार्ह आहे. गोरक्षेच्या नावाखाली आपल्याच समाजातील बांधवांसोबत अमानवीय व्यवहार हा अपराधच आहे, असा या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
सामाजिक समरसतेच्या वातावरणाला बिघडविणारी ही घटना आहे. या परिस्थितीत शांती प्रस्थापित व्हावी यासाठी सरकारसोबतच समाजालादेखील विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. अशा घटनांना राजकीय चेहरा देणे किंवा समाजात जातीय तेढ वाढेल असे प्रयत्न करणे अयोग्य असून ते टाळले पाहिजे, असे आवाहनदेखील संघातर्फे करण्यात आले आहे.