विरोधी पक्षाला डावलले
By Admin | Updated: November 11, 2015 02:21 IST2015-11-11T02:21:26+5:302015-11-11T02:21:26+5:30
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधील घराचे लोकार्पण करण्याच्या समारंभासाठी विरोधी पक्षांना आमंत्रित न करण्यात आल्याबद्दल मंगळवारी काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली

विरोधी पक्षाला डावलले
मुंबई : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधील घराचे लोकार्पण करण्याच्या समारंभासाठी विरोधी पक्षांना आमंत्रित न करण्यात आल्याबद्दल मंगळवारी काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली. संघ मानसिकतेच्या सरकारकडून आणखी काय अपेक्षा करणार, असा सवाल प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला.
लंडनमधील या घराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १४ नोव्हेंबरला होणार आहे. या समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे -पाटील वा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याला आमंत्रित करण्यात आलेले नाही.
मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की, हा समारंभ अतिशय छोटेखानी असेल. डॉ. आंबेडकर यांचे ते घर निवासी वस्तीमध्ये असल्याने त्या ठिकाणच्या नियमानुसार मोठा समारंभ, ध्वनिक्षेपण व्यवस्था असे करता येत नाही. त्यामुळेच मर्यादित लोकांच्या उपस्थितीत लोकार्पणाचा समारंभ होईल.
सचिन सावंत यांनी आरोप केला की संघ मानसिकतेच्या राज्य सरकारने विरोधी पक्षांना इंदू मिलच्या जागेवर डॉ. आंबेडकर यांचे स्मारकाच्या भूमिपूजन समारंभाचेदेखील आमंत्रण दिलेले नव्हते. यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की दोन्ही विरोधी पक्षनेत्यांना इंदू मिलच्या समारंभाचे रीतसर आमंत्रण देण्यात आले होते.
(विशेष प्रतिनिधी)
डॉ. बाबासाहेबांचे घर खरेदी करण्यासाठीची बोलणी करणे आणि पाहणी यावर मंत्री, अधिकाऱ्यांच्या लंडन भेटीवर आतापर्यंत २५ लाख ४५ हजार रुपये खर्च झाले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी याबाबत शासनाकडून माहिती मिळविली. या घर खरेदीच्या व्यवहाराचा एक भाग म्हणून सॉलिसिटर कंपनीला ३ कोटी १० लाख रुपये देण्यात आले. घराची किंमत म्हणून ३२ कोटी रुपये मेसर्स सेडॉन या सॉलिसिटर कंपनीच्या खात्यात राज्य शासनाकडून रिझर्व्ह बँकेमार्फत जमा करण्यात आले आहेत.