‘जय विदर्भ’ला विरोध का?
By Admin | Updated: November 12, 2014 01:02 IST2014-11-12T01:02:14+5:302014-11-12T01:02:14+5:30
विदर्भाचा मुख्यमंत्री झाल्यानंतर स्वतंत्र राज्याच्या संकल्पनेला मूर्त रूप येईल, अशी वैदर्भीय जनतेची सार्वत्रिक इच्छा असताना या भागातील आमदारांनी शपथ घेतल्यानंतर ‘जय विदर्भ’चा नारा दिला

‘जय विदर्भ’ला विरोध का?
सेनेविरुद्ध संताप : विदर्भाचा जयजयकार केला तर बिघडले कुठे?
नागपूर: विदर्भाचा मुख्यमंत्री झाल्यानंतर स्वतंत्र राज्याच्या संकल्पनेला मूर्त रूप येईल, अशी वैदर्भीय जनतेची सार्वत्रिक इच्छा असताना या भागातील आमदारांनी शपथ घेतल्यानंतर ‘जय विदर्भ’चा नारा दिला म्हणून शिवसेनेने आक्षेप घेणे आणि त्यानंतर आमदारांना तंबी देणे याच्या संतप्त प्रतिक्रिया विदर्भात उमटल्या आहेत. शिवसेनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत असतानाच भाजपने या मुद्यावर त्यांची भूमिका स्पष्ट करून विदर्भाचा आवाज अधिक बुलंद करावा, अशी मागणी होत आहे.
भाजपने सुुरुवातीपासूनच स्वतंत्र विदर्भ राज्याचे समर्थन केले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी या मुद्यावर मतेही मागितली. जनतेनेही त्यांना कौल दिला. त्यामुळे भाजपचे केंद्र आणि राज्यात सरकार आल्यावर लोकांच्या स्वतंत्र राज्याविषयी अपेक्षा वाढल्या आहेत. त्याचेच प्रतिबिंब म्हणून नागपूरमधील भाजपचे आमदार अनुक्रमे विकास कुंभारे, कृष्णा खोपडे आणि सुधाकर देशमुख यांनी शपथ घेतल्यानंतर ‘जय विदर्भ’चा नारा दिला. मात्र यामुळे राजकारण पेटले. शिवसेनेने त्यावर आक्षेप घेतल्याने त्याच्या तीव्र भावना विदर्भात उमटल्या आहेत. शिवसेनेच्या विदर्भ विरोधी भूमिकेचा भाजपचे नागपूरमधील आमदार आणि विदर्भवादी नेत्यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. यापूर्वीही नागपूरमध्ये होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनात दोन्ही सभागृहात विदर्भातील अनेक आमदारांनी विविध प्रस्तावावरील चर्चे दरम्यान ‘जय विदर्भ’चा नारा दिला. मात्र त्यावेळी त्याला कोणी विरोध केला नाही. ‘जय विदर्भ ’म्हणणे हा गुन्हा आहे काय, असा सवाल करतानाच सेनेचा विरोध अनाकलनीय असल्याची भावना सामान्य जनतेत व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
जय विदर्भ म्हणणे
घटनाविरोधी नाही
जय विदर्भचा नारा देणे घटना विरोधी किंवा नियमबाह्य नाही, विदर्भ हा महाराष्ट्राचाच भाग आहे. त्यामुळे शिवसेनेचा आक्षेप अयोग्य ठरतो. शिवसेनेचे सदस्यही ‘जय भवनी जय शिवाजी’ असा नारा देतातच. भवानी हे देवीचे नाव आहे. मग त्यावरही आक्षेप घ्यायचा काय. मी आमदार असताना अनेक वेळा जय विदर्भाचा नारा दिला आहे.
वामनराव चटप,
ज्येष्ठ विदर्भवादी व माजी आमदार
हा तर व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला
घटनेच्या चौकटीत राहून प्रत्येकाला त्याच्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आमदार म्हणून विदर्भाचा नारा देणे चुकीचे नाही. तो त्यांचा अधिकार आहे. शिवसेना ही काही राज्याची मालक नाही, कोणी काय बोलावे हे ठरविणारा हा पक्ष कोण ?. जय विदर्भ म्हणण्यावर आक्षेप घेणे म्हणजे आमदारांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घालण्यासारखे आहे.
राम नेवले, निमंत्रक,
विदर्भ राज्य आंदोलन समिती