उद्योगक्षेत्रात तरुणांना संधी
By Admin | Updated: August 2, 2016 01:19 IST2016-08-02T01:19:48+5:302016-08-02T01:19:48+5:30
अशा समस्या शोधा, ज्यासाठी तुम्हाला एखादी व्यक्ती पैसे देईल.

उद्योगक्षेत्रात तरुणांना संधी
पुणे : अशा समस्या शोधा, ज्यासाठी तुम्हाला एखादी व्यक्ती पैसे देईल. तुम्हाला जेव्हा वाटेल एखादी गोष्ट अधिक चांगली होऊ शकते, ती लिहून काढा. पुढे तुम्हाला त्यातच व्यवसाय करता येईल, असे मार्गदर्शन पर्सिस्टंट सिस्टीम्सचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आनंद देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना केले. उद्योगक्षेत्रात तरुणांना संधी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
विख्यात संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांच्या ‘आॅनलाईन स्टार्ट अप : ई-व्यवसायाचा रोडमॅप’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. देशपांडे यांच्या हस्ते सोमवारी झाले, त्या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, मराठा चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरचे महासंचालक डॉ. अनंत सरदेशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपिस्थत होते.
डॉ. देशपांडे यांनी मनोगत व्यक्त न करता विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून उद्योगाबाबत विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. ते म्हणाले, की तुम्ही तुमच्या कल्पनेवर काम करणे महत्त्वाचे आहे. उद्योजकाला लोकांना आकर्षित करता यायला हवे. नोकऱ्यांची सख्या कमी असल्याने तरुणांंना उद्योगक्षेत्रात जास्त संधी आहेत. तरुणांनी त्याचा विचार करायला हवा.’’
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, ‘‘मराठी माणसांनी गरिबीची मानसिकता बदलायला हवी. आपल्या समाजात उद्योजक होण्यासाठी अनास्था दिसून येते. अभ्यासक्रमामध्येसुद्धा उद्योजकांची चरित्रे यायला हवीत. आपल्याकडे उद्योगात अनेक संधी जरी असल्या, तरी कुशल कामगारांची कमतरता आहे. त्यामुळे उपयुक्त मनुष्यबळ उभारण्याचे आव्हान शिक्षणक्षेत्रासमोर आहे.’’ आनंद आगाशे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. खरोसेकर, मालती कलमाडी उपस्थित होत्या. मुक्ता करमरकर यांनी सूत्रसंचालन केले.