आरटीईअंतर्गत शिक्षणाची संधी
By Admin | Updated: April 28, 2016 03:11 IST2016-04-28T03:11:01+5:302016-04-28T03:11:01+5:30
भरमसाठ शुल्क भरण्याची कुवत नसल्याने कित्येक पालकांना आपल्या पाल्यांना येथे शिकवता येत नाही.

आरटीईअंतर्गत शिक्षणाची संधी
अरुणकुमार मेहत्रे,
कळंबोली- नामांकित शाळांमध्ये आपल्या पाल्यांना शिक्षण घेता यावे, अशी पालकांची इच्छा असते. मात्र भरमसाठ शुल्क भरण्याची कुवत नसल्याने कित्येक पालकांना आपल्या पाल्यांना येथे शिकवता येत नाही. परंतु आरटीई कायद्याअंतर्गत वंचित व दुर्बल घटकांतील १,७७७ पालकांचे आपल्या मुलांना हायफाय शाळेत शिक्षण देण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. आरटीईअंतर्गत आॅनलाइन पद्धतीने २५ टक्के प्रवेश प्रक्रि येसाठी २५ एप्रिल रोजी सोडत काढण्यात आली. त्यामध्ये पहिल्या फेरीत बऱ्या विद्यार्थ्यांना संधी मिळाली आहे. पालकांनी त्वरित त्या त्या शाळेत जाऊन प्रवेश घ्यावेत, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे
पनवेल, नवीन पनवेल, खांदा वसाहत, खारघर, कामोठे, कळंबोली या भागात मोठ्या प्रमाणात खासगी शैक्षणिक संस्था आहेत. विशेषकरून डीएव्ही, सेंट जोसेफ, न्यू होरायझन यासारख्या विविध नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळविण्याकरिता धनदांडग्यापासून मध्यमवर्गीय पालकांची उडी पडते. कित्येकांना शुल्क भरण्याची तयारी असतानाही प्रवेश मिळत नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर नर्सरीला प्रवेश घेतला तरच या शाळेमध्ये पहिलीला प्रवेश मिळतो. त्यामुळे पूर्व प्राथमिककरिता मोठ्या प्रमाणात नामांकित आणि ठरावीक शाळांना मागणी आहे. मोठ्या प्रमाणात शुल्क आकारले जात असल्याने दुर्बल आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रवेश पूर्वी मिळत नव्हता. कारण हे शुल्क त्यांच्या पालकांच्या खिशाला परवडणार नव्हते आणि आजही नाही. मात्र राज्य शासनाने शिक्षणाचा अधिकार हा कायदा संमत केला. त्यानुसार दुर्बल आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांकरिता २५ टक्के जागा ठेवण्याची सक्ती करण्यात आली आहे.
प्रवेशप्रक्रि येत विद्यार्थ्यांना घरापासून एक किमी ते तीन किमी अंतरावरच्या शाळेत प्रवेश देण्याचे आदेश राज्य प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. त्यानुसार पनवेल परिसरातील शाळांमध्ये लवकरच २५ टक्के प्रवेश प्रक्रि या आॅनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. या प्रवेश प्रक्रि येत संबंधित शाळांमधून आॅनलाइन प्रवेश अर्ज भरून घेण्यात आले. याकरिता पालकांच्या मदतीसाठी मदत केंद्रही उभारण्यात आले होते. या व्यतिरिक्त विविध राजकीय पक्ष त्याचबरोबर सामाजिक संस्थांनी याकरिता जनजागृती केली.
खांदा वसाहतीत माजी नगरसेवक शिवाजी थोरवे यांनी याकरिता खास मदत केंद्र सुरू केले होते. त्यांनी एकूण १०७ अर्ज भरून घेतले त्यापैकी पहिल्या टप्प्यात ४० विद्यार्थ्यांचे सोडतीत नाव आले आहे. थोरवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पालकांना कागदपत्राच्या जमवाजमवीला मदत केली. त्याचबरोबर तहसीलदार दीपक आकडे, नायब तहसीलदार बी. टी. गोसावी, कल्याणी कदम यांनी सुध्दा पुढाकार घेऊन आरटीई प्रवेशाकरिता जे काही दाखले आवश्यक आहेत ते त्वरित पालकांना उपलब्ध करून
दिले.