केडीएमसी आयुक्तांवर विरोधकांनी डागली तोफ
By Admin | Updated: March 10, 2015 04:11 IST2015-03-10T04:11:21+5:302015-03-10T04:11:21+5:30
केडीएमसीच्या सोमवारच्या महासभेत आयुक्त मधुकर अर्दड यांच्या कार्यपद्धतीवर विरोधकांनी तोफ डागली. आयुक्त सत्ताधारीधार्जिणे असून त्यांचे
केडीएमसी आयुक्तांवर विरोधकांनी डागली तोफ
कल्याण : केडीएमसीच्या सोमवारच्या महासभेत आयुक्त मधुकर अर्दड यांच्या कार्यपद्धतीवर विरोधकांनी तोफ डागली. आयुक्त सत्ताधारीधार्जिणे असून त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, असा आरोप नगरसेवक सचिन पोटे यांनी केला़ त्यांच्या वक्तव्याने संतापलेल्या आयुक्तांनी अखेर अधिकाऱ्यांसह सभात्याग केल्याने महासभा चांगलीच वादग्रस्त ठरली.
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी आणि शनिवारी कल्याण डोंबिवलीतील विकासकामांचा आढावा घेतला. यानिमित्ताने आयोजित बैठकीला विरोधी पक्षनेते तसेच अन्य गटनेत्यांना बोलाविले नव्हते. याचा जाब विचारून विरोधकांनी आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन छेडले होते. त्याचे पडसाद सोमवारच्या तहकूब महासभेत उमटले. सभेला सुरुवात होताच नगरसेवक अरविंद पोटे यांनी मुख्यालयालगत असलेली महापालिकेची गुजराती शाळा पत्रे लावून बंद करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला. शाळेच्या मालमत्तेवरील पत्रे जोपर्यंत हटविले जात नाहीत तोपर्यंत सभा तहकूब करण्याची मागणी नगरसेवक राजेंद्र देवळेकर, मंदार हळबे यांनी लावून धरली. शिक्षण मंडळ प्रशासनातील अधिकारी यात दोषी असून त्यांना निलंबित करण्याची मागणी केली. याकडे आयुक्तांचे वारंवार लक्ष वेधूनही कारवाई होत नसल्याकडे लक्ष वेधण्यात आले. यावर नगरसेवक सचिन पोटे यांनी आयुक्तांचे मानसिक संतुलन बिघडल्याची टीका केली. त्यांच्या वक्तव्यावर आयुक्तांनी हरकत घेऊन आरोप सहन करणार नाही, असे सांगून अधिकाऱ्यांसह सभात्याग केला.
यावेळी सभागृहात एकच गदारोळ झाला. पालकमंत्र्यांच्या बैठकीचा दाखल देऊन आयुक्त हे महापालिकेचे आहेत की शिवसेनेचे शहरप्रमुख आहेत, अशी बोचरी टीकाही पोटे यांनी केली. पालकमंत्री सांगतील तेच काम करू अशी उत्तरे राष्ट्रवादीच्या वसंत भगत यांना ते देऊ कशी शकतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पालकमंत्र्यांचा उल्लेख होताच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली. या गदारोळातच महापौर कल्याणी पाटील यांनी तातडीने शाळेभोवती घातलेले पत्रे काढून टाका, असे आदेश दिले. यानंतर ते हटविण्याची कारवाई प्रशासनाकडून करण्यात आली. (प्रतिनिधी)