कर्नाटकच्या दुधाला वितरकांचा विरोध
By Admin | Updated: October 20, 2016 06:51 IST2016-10-20T06:51:05+5:302016-10-20T06:51:05+5:30
सहकारी दूध संस्था डबघाईला आलेल्या असताना, गुजरातच्या ‘अमूल’नंतर आता कर्नाटक सहकारी दूध उत्पादन फेडरेशन (केएमएफ)च्या ‘नंदिनी’ ब्रॅण्डचे दूध राज्यात आले

कर्नाटकच्या दुधाला वितरकांचा विरोध
मुंबई : राज्यातील सहकारी दूध संस्था डबघाईला आलेल्या असताना, गुजरातच्या ‘अमूल’नंतर आता कर्नाटक सहकारी दूध उत्पादन फेडरेशन (केएमएफ)च्या ‘नंदिनी’ ब्रॅण्डचे दूध राज्यात आले असून त्याचा शुभारंभ बुधवारी एका पंचतारांकित हॉटेलात करण्यात आला. मात्र, ‘केएमएफ’कडून आपली फसवणूक झाल्याचे सांगत एका वृद्धाने व्यासपीठावर घसून गोंधळ घातला. तर ‘महानंद’च्या वितरकांनी ‘नंदिनी’ला विरोध केल्याने दुग्धविकासमंत्री महादेव जानकर या कार्यक्रमाकडे फिरकलेच नाहीत.
राजकीय नेत्यांच्या खासगी दूध संघांमुळे आधीच राज्यातील सहकारी दूध संघ डबघाईला आलेले असताना सरकार परप्रांतातील दुधासाठी पायघड्या घालत आहे. खासगी दुग्ध उत्पादकांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी गोकूळ, वारणा, कात्रज या संस्थांच्या मदतीने महाराष्ट्राचा एकच ब्रँड आणण्याचा मनोदय मंत्री जानकर यांनी बोलून दाखवला होता. मात्र, तो अमलात येण्याआधीच कर्नाटकच्या दुधाचे आगमन झाले.
कर्नाटक सहकारी दूध उत्पादन फेडरेशन (केएमएफ)च्या ‘नंदिनी’ या दूध ब्रॅण्डचा शुभारंभ बुधवारी कर्नाटकचे पशुसंवर्धन आणि रेशीम उत्पादन मंत्री ए. मंजू, कर्नाटकातील श्री मंजुनाथेश्वर मंदिराचे धर्माधिकारी पद्मविभूषण डॉ. डी वीरेंद्र हेगडे यांच्या उपस्थितीत मुंबईत झाला. या वेळी खा. गोपाळ शेट्टीही व्यासपीठावर होते. मात्र, केएमएफने २० वर्षांपूर्वीही मुंबईत दूध उत्पादन आणले होते. त्यावेळी तब्बल १८ लाखांची फसवणूक करून त्यांनी परस्पर मुंबईतील वितरण बंद केले, असा आरोप एका व्यक्तीने केल्याने सभागृहात खळबळ उडाली.
‘महानंद’च्या वितरकांचा विरोध
जिल्हा दूध संघांकडून संकलित केलेले दूध महानंदासारख्या शासकीस ब्रॅण्डला पुरविण्याऐवजी ‘मदरडेअरी’कडे वळविण्यात येते. त्यामुळे महानंदाला बाहेरून दूध घेऊन वितरण करावे लागते. आजच मुंबईत आलेल्या कर्नाटकच्या केएमएफकडून महानंदाने २ लाख लिटर सुटे दूध घेतले आणि पॅकिंग करून वितरण केले.
परराज्यातील अमूल, केएमएफ अशा दूध ब्रॅण्डना राज्य शासनाकडून प्रोत्साहन दिले जाते. बाहेरचे
दूध इथे आणून विकले जाते. त्यामुळे राज्यातील शेतकरी आणि वितरकांचे मोठे नुकसान होत आहे, असा
आरोप महानंदा वितरक संघाचे उपाध्यक्ष धर्मेंद्र काळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. (प्रतिनिधी)
>मंत्र्यांना घालणार होते घेराव...
कर्नाटकातील
सहकारी दूध उत्पादनाच्या मुंबईतील शुभारंभासाठी दुग्धविकासमंत्री महादेव जानकर येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर वितरक संघाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सभागृहात उपस्थित राहिले.
मंत्र्यांना घेराव घालून याचा जाब विचारणार असल्याचे काळे यांनी सांगितले. मात्र वाद टाळण्यासाठी जानकर यांनी कार्यक्रमाला बगल दिली.