विरोधकांची डाळ शिजू देणार नाही
By Admin | Updated: October 8, 2014 23:02 IST2014-10-08T22:09:15+5:302014-10-08T23:02:36+5:30
नारायण राणे : मसुरे येथील प्रचारसभेत मोदींवर टीका

विरोधकांची डाळ शिजू देणार नाही
मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली २५ वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना जिल्ह्याची मागासलेला ही ओळख पुसून टाकण्याचे काम मी केले. आमदार, मंत्री, पालकमंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता या विविध पदांच्या माध्यमातून जिल्ह्यात आरोग्य, शिक्षणाच्या गरजा पूर्ण केल्या. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कुठेही कमी पडलो नाही. मी असेपर्यंत विरोधकांची डाळ शिजू देणार नाही, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रचार समिती प्रमुख नारायण राणे यांनी केले. मसुरे येथील प्रचार सभेत ते बोलत होते. राणे म्हणाले, मुख्यमंत्री पदाच्या कालावधीत पहिल्यांदाच अर्थसंकल्पात जिल्ह्यासाठी ९८ कोटी रूपये मंजूर करीत ३२ पुलांची कामे केली. पिण्याच्या पाण्यासाठी ११९ कोटी रूपये दिले, त्यामुळे टॅँकरमुक्ती मिळाली. रस्ते, पाणी, वीज, शाळा, आरोग्य या सर्वच क्षेत्रांसाठी आपण भरघोस निधी दिला. १९९० साली या जिल्ह्याला ६ कोटी रूपये निधी उपलब्ध होत होता. मात्र आज १०५ कोटी रूपये निधी जिल्ह्यात नियोजनासाठी उपलब्ध होत आहेत. जिल्ह्याच्या विकासात मी कुठेही कमी पडलो नाही. आपली डाळ शिजणार नाही. या भितीपोटी मला विरोधक विरोध करीत आहेत. विरोध करण्यापलिकडे त्यांचे एकतरी काम दाखवा. कोकणात माझ्यासमोर सक्षमपणे उभा राहणारा अन्य पक्षातील एकतरी नेता दाखवा. पुणे- मुंबईशी स्पर्धा करणारा जिल्हा म्हणून सिंधुदुर्गचा विकास मला करावयाचा आहे. जिल्हावासियांमुळेच मला अनेक पदे मिळाली. यापुढील काळात तुमच्या उपकाराचे ऋण म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याला महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या नकाशावर समृद्ध जिल्हा म्हणून घडविण्याचा माझा संकल्प आहे, असे राणे म्हणाले. महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा भाजपाचा कट असल्याचेही ते म्हणाले. यावेळी संदेश पारकर, दत्ता सामंत, अशोक सावंत, साईनाथ चव्हाण, बाळू कोळंबकर, संग्राम प्रभूगावकर, कृष्णनाथ तांडेल, सुहास हडकर, छोटू ठाकूर, पपन मेथर, गोपी पालव, सरोज परब, कांचन गावडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) उद्योग परत आणा धास्तावलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मी जिवंत असेपर्यंत मुंबई महाराष्ट्रापासून तोडू देणार नाही, असे वक्तव्य केले आहे. अरे काय बिशाद तुमची? आम्ही जिवंत असेपर्यंत महाराष्ट्रापासून मुंबई तोडू देणार नाही. एवढेच प्रेम असेल तर मुंबईतून पळविलेले उद्योग पूर्ववत महाराष्ट्रात आणा, अशी राणे यांनी टीका केली.