विरोधक राईचा पर्वत करत आहेत - मुनगंटीवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2015 13:19 IST2015-06-30T13:19:35+5:302015-06-30T13:19:35+5:30
अग्निरोधक यंत्राच्या खरेदीत एक रुपयाचाही घोटाळा झाला नसून या खरेदीप्रक्रियेवरुन नाहक राईचा पर्वत उभा केला जात आहे असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

विरोधक राईचा पर्वत करत आहेत - मुनगंटीवार
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - अग्निरोधक यंत्राच्या खरेदीत एक रुपयाचाही घोटाळा झाला नसून या खरेदीप्रक्रियेवरुन नाहक राईचा पर्वत उभा केला जात आहे असे सांगत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडेंची पाठराखण केली आहे. भाजपा सरकारची बदनामी करण्याचा हा कट असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
शिक्षण खात्यातर्फे दिल्या गेलेल्या १९१ कोटी रुपयांच्या कंत्राटात अनियमतता आढळल्याने अर्थखात्याने या कंत्राटाला स्थगिती दिली होती. त्यामुळे शिक्षण मंत्री विनोद तावडे अडचणीत आले आहेत. यापार्श्वभूमीवर मंगळवारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील व शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेतली. गुजरातमधील शाळेत आग लागल्यावर सुप्रीम कोर्टाने देशभरातील सर्व शाळांमध्ये अग्निरोधक यंत्र बसवणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे आम्ही शाळांमध्ये अग्निरोधक यंत्रणा बसवण्यासाठी कंत्राट दिले. जर हे कंत्राट दिले नसते तर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन झाले असते असे चंद्रकांत पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. अर्थखात्याने कंत्राटप्रक्रियेतील त्रुटी निदर्शनास आणून दिल्यावर शिक्षण खात्याने पुन्हा ती फाईल आमच्याकडे पाठवली नाही, सरकारच्या या दक्षतेचे कौतुक करण्याऐवजी आमच्या कामाविषयी गैरसमज पसरवले जात आहे अशी खंत सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
तीन लाख रुपयांवरील कामांचे ईटेंडरिंग काढण्याचे आदेश एप्रिलनंतर देण्यात आले. शिक्षण खात्याने दिलेले कंत्राट फेब्रुवारीतील आहेत. वेळेअभावी प्रत्येक कामाचे ई टेंडरिंग करणे हे दरवेळी शक्य नसल्याने रेट काँन्ट्रेक्टपद्धत राबवली जाते, १९९० पासून ही पद्धत सुरु आहे असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. जी खरेदी झालीच नाही, ज्यात अद्याप एक रुपयाची खर्च झाला नाही, कंत्राटही स्थगित करण्यात आले त्याला घोटाळा म्हणून राईचा पर्वत केला जात आहे असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.