पावसाची उघडीप; कमाल तापमानात वाढ
By Admin | Updated: October 8, 2016 01:10 IST2016-10-08T01:10:53+5:302016-10-08T01:10:53+5:30
नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवसापासून मुंबापुरीला झोडपणाऱ्या पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला

पावसाची उघडीप; कमाल तापमानात वाढ
मुंबई : नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवसापासून मुंबापुरीला झोडपणाऱ्या पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. गुरुवारपर्यंत बरसलेल्या पावसाने शुक्रवारी दिवसभर उघडीप घेतली असतानाच दिवसभर मोकळ्या राहिलेल्या आकाशामुळे मुंबापुरीत कडाक्याचे ऊन पडल्याचे चित्र होते. तर कमाल तापमानात ४ अंशांची वाढ झाली असून, कमाल तापमान २७ वरून ३१ अंशांवर पोहोचले आहे.
मुंबईत बुधवारी तुरळक ठिकाणी जोरदार बरसलेल्या पावसाने गुरुवारी मात्र आपला जोर कमी केला आणि शुक्रवारी तर जवळपास त्याने पूर्ण दिवस उघडीपच घेतली. मागील आठवड्याभरापासून पावसाची रिमझिम सुरू राहिल्याने मुंबईचे कमाल तापमान जवळपास २७ अंशांवर घसरले होते. परिणामी रात्री वाहणाऱ्या थंड वाऱ्याने मुंबईकरांना थंडीची चाहूलही दिली होती.
गुरुवारसह शुक्रवारी पावसाचा जोर ओसरल्याने कमाल तापमानाने पुन्हा उसळी घेतली आहे. कमाल तापमानात तीन अंशांची वाढ झाल्याने २७ अंशांवर घसरलेले कमाल तापमान ३१ अंशांवर पोहोचले. तर शनिवारी, रविवारी मुंबईतील आकाश सामान्यत: ढगाळ राहील आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. (प्रतिनिधी)