मंत्रालयातील ‘नोकरी रॅकेट’ उघड
By Admin | Updated: November 10, 2014 03:55 IST2014-11-10T03:55:23+5:302014-11-10T03:55:23+5:30
बेरोजगारांना मंत्रालय, वखार महामंडळात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणारे रॅकेट अखेर पोलिसांनी उघड केले आहे

मंत्रालयातील ‘नोकरी रॅकेट’ उघड
अहमदनगर : बेरोजगारांना मंत्रालय, वखार महामंडळात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणारे रॅकेट अखेर पोलिसांनी उघड केले आहे. याप्रकरणी आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मंत्रालयात नियुक्ती दिल्याचे बनावट लेटर पॅड वापरून फसवणूक करणारे रॅकेट कार्यरत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या रॅकेटमधील आणखी काही आरोपी पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.
नगर येथील भाऊसाहेब नाथा शेळके (रा. वाघोली, ता. शेवगाव) यांनी ३ नोव्हेंबरला दिलेल्या फिर्यादीनुसार उषा मोहन मुंडे (रा. रेल्वे स्टेशन रोड) यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. मुंडे यांना पहिल्याच दिवशी अटक झाली होती. त्यांनी काही आरोपींची नावे सांगितली. त्यानंतर पोलिसांनी दोनच दिवसांत प्रकरणाचा पर्दाफाश करीत आणखी तीन आरोपींना अटक केली. राहुल गुलाबराव खामकर (रा. चांदेली, जि. सातारा), दत्तात्रय सदाशिव धापटे (रा. लांडेनगर, पुणे) जॉन पिटर एरीक (पिंपळे सौदागर, पुणे) यांना पुणे, सातारा येथून अटक केली. पाचवा आरोपी असिफ सय्यद फरार आहे.
चारही आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे. असिस्टंट व क्लार्क पदावर नियुक्ती झाल्याचे बनावट नियुक्ती पत्र आरोपी तयार करीत होते. त्यांनी ही पत्रे कुठे तयार केली, याची माहिती अद्याप लागलेली नाही. त्यांनी आणखी काही साथीदारांची नावे सांगितली आहेत. मात्र त्यांची नावे अपूर्ण असल्याने त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. ते साथीदारही पुणे व सांगली जिल्ह्यातील आहेत. मुंडे यांनी घेतलेले साडेतीन लाख रुपये सर्वांनी समान वाटप करून घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
प्रकरणातील साक्षीदार सतीश विश्वास खरड यांनी बनावट नियुक्तीपत्राची प्रत पोलिसांना दिली आहे. त्याची सत्यता पडताळून पाहिल्यानंतरच या रॅकेटमधील आणखी फसवणुकीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)