शेतकऱ्यांचे समाधान झाले तरच ‘समृद्धी’
By Admin | Updated: July 16, 2017 01:05 IST2017-07-16T01:05:47+5:302017-07-16T01:05:47+5:30
शेतकऱ्यांचे पूर्ण समाधान झाले आहे तिथेच समृद्धी महामार्गासाठी जमिनी घेतल्या जात आहेत पण, शेतकऱ्यांचा विरोध असेल तिथे शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी

शेतकऱ्यांचे समाधान झाले तरच ‘समृद्धी’
- विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शेतकऱ्यांचे पूर्ण समाधान झाले आहे तिथेच समृद्धी महामार्गासाठी जमिनी घेतल्या जात आहेत पण, शेतकऱ्यांचा विरोध असेल तिथे शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी पूर्णपणे उभी राहील, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पत्र परिषदेत स्पष्ट केले.
शिवसेनेने आधी या महामार्गाला विरोध केला होता. मात्र, सार्वजनिक उपक्रम मंत्री, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी नागपुरात जाऊन तेथे शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या मोबदल्यापोटी चेक दिल्याने शिवसेनेच्या भूमिकेवर विरोधकांनी टीका केली होती. या पार्श्वभूमीवर, ठाकरे यांनी शनिवारी पत्र परिषद घेतली. शिंदे हेही तेव्हा उपस्थित होते.
महामार्गासाठी सुपीक जमीन घेता कामा नये. शेतकऱ्यांचे पूर्ण समाधान झालेच पाहिजे, या भूमिकेवर शिवसेना ठाम आहे व त्यासाठी आम्ही सरकारला विरोध करू. महामार्गासाठी सुपीक जमीन जाऊ देणार नाही. तसेच योग्य मोबदला मिळतो की नाही याची खबरदारी आम्ही घेऊ, असे उद्धव ठाकरे म्हणाले. यापूर्वी एखादा प्रकल्प मंत्रिमंडळाने मंजूर केला की सरकारी अधिकारीच तो पुढे रेटत असत. मात्र आता एकनाथ शिंदे असतील वा शिवसेनेचे इतर मंत्री असतील ते प्रत्यक्ष जाऊन सर्व संबंधितांशी चर्चा करत आहेत. कोणाचे आक्षेप असतील तर ते ऐकून घेत आहेत. हे कदाचित प्रथमच घडत असेल. शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याचीच काळजी शिवसेनेचे मंत्री घेत आहेत. पहिल्या युती सरकारच्या काळात मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग झाला. तेव्हाही काही जणांचा विरोध होता. मात्र सर्वांचे समाधान झाल्यानंतरच सरकार पुढे गेले.आता सर्वांचे समाधान होत असेल तरच हा महामार्ग होईल. विकास करताना वा कोणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमच्या शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा होऊ देणार नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
शेतकरी स्वत:हून आले : शिंदे
सुपीक जमिनी वाचवूनही हा महामार्ग होऊ शकतो. त्याबाबत मंत्री, अधिकारी व संबंधित शेतकऱ्यांची चर्चा केली जाईल आणि त्यातून आलेला प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना दिला जाईल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. शिंदे म्हणाले की, नागपूरनजीक हिंगणा येथे भूसंपादनासाठी शेतकरी शुक्रवारी स्वत:हून समोर आले. त्यांना कोणीही जबरदस्ती केलेली नव्हती.