मे, जून महिन्यामध्ये फक्त एकच विवाहमुहूर्त

By Admin | Updated: January 5, 2016 02:21 IST2016-01-05T02:21:06+5:302016-01-05T02:21:06+5:30

विवाह सोहळ्यासाठी सोयीच्या समजल्या जाणाऱ्या मे आणि जून महिन्यात या वर्षी केवळ एकच विवाहमुहूर्त असल्याने वधू-वर पित्यांची लग्न जमवण्यासाठी व मंगल कार्यालय बुकिंगसाठी धावपळ सुरू झाली आहे.

Only one wedding in May, June | मे, जून महिन्यामध्ये फक्त एकच विवाहमुहूर्त

मे, जून महिन्यामध्ये फक्त एकच विवाहमुहूर्त

पवनानगर : विवाह सोहळ्यासाठी सोयीच्या समजल्या जाणाऱ्या मे आणि जून महिन्यात या वर्षी केवळ एकच विवाहमुहूर्त असल्याने वधू-वर पित्यांची लग्न जमवण्यासाठी व मंगल कार्यालय बुकिंगसाठी धावपळ सुरू झाली आहे.
दहावी, बारावी व माध्यमिक शाळांच्या परीक्षा संपल्यानंतर म्हणजे २० एप्रिल ते १५ जून या कालावधीत विवाह सोहळ्याला मावळ तालुक्यात पसंती दिली जाते. या काळात शेतीची कामे कमी असतात. मुलांच्या परीक्षा संपलेल्या असतात. बाहेरगावच्या पाहुणे मंडळींना विवाह समारंभासाठी येण्यास अडचण नसते. त्यामुळे गेली अनेक वर्षे साधारणत: एप्रिल महिन्यातील शेवटच्या १० दिवसांपासून विवाह सोहळ्यांचा धुमधडाका सुरू होतो. मात्र, या वर्षी मे महिन्यात फक्त १ तारखेलाच विवाह मुहूर्त आहे. यानंतर दोन महिने मुहूर्त नाहीत. ते पुन्हा ७ जुलैपासून सुरू होणार आहेत. यामुळे वधू-वर पित्यांचे पालक लग्नमुहूर्त कधी काढावा, या चिंतेत आहेत. या वर्षी एकूण १०७ विवाहमुहूर्त आहेत. १ जानेवारी ते १ मे या कालावधीत म्हणजे मुख्य हंगामामध्ये ५० मुहूर्त आहेत. ऐन मार्च व एप्रिल या परीक्षेच्या कालावधीतच अनेक मुहूर्त आहेत.
जुलैनंतर मुहूर्त असले, तरी या काळात मावळात जोरदार पाऊस असतो. त्यामुळे १५ जूननंतर क्वचितच विवाह सोहळा होतो. या वर्षी १६ एप्रिल ते १ मे या तारखांचे तालुक्यातील सर्वच कार्यालयांत बुकिंग झाल्याने त्यापूर्वीच्या तारखाच घ्याव्या लागणार आहेत.
तळेगाव दाभाडे येथील पुरोहित नितीन जोशी यांनी सांगितले की, या वर्षी मे व जून महिन्यात शुक्रलोप असल्याने विवाह मुहूर्त नाहीत. यामुळे वधू-वर पित्यांनी अगोदरच लग्नमुहूर्त काढावेत.
मंगल कार्यालयचालक दिनकर घारे म्हणाले की, वधू-वर पित्यांचा मे महिन्यात विवाह सोहळ्यासाठी कल असतो. या वर्षी मुहूर्त नसल्याने बुकिंग नाही. मात्र, १५ एप्रिलनंतरच्या सर्व तारखा अगोदरच बुक झाल्या आहेत. आता लोक अगोदरच्या तारखांचे बुकिंग करू लागले आहेत.(वार्ताहर)

Web Title: Only one wedding in May, June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.