सर्व बँक खात्यांसाठी एकच ‘ई-पासबुक’
By Admin | Updated: December 29, 2014 06:01 IST2014-12-29T06:01:53+5:302014-12-29T06:01:53+5:30
तुमची एकापेक्षा अधिक बँक खाती असतील तर यापुढे त्या खात्यांवर लक्ष ठेवणे किंवा व्यवहार करणे सुलभ करण्याच्या दृष्टीने आता सर्व बँकांसाठी एकच वेबसाईट ही संकल्पना प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर आहे

सर्व बँक खात्यांसाठी एकच ‘ई-पासबुक’
मनोज गडनीस, मुंबई
तुमची एकापेक्षा अधिक बँक खाती असतील तर यापुढे त्या खात्यांवर लक्ष ठेवणे किंवा व्यवहार करणे सुलभ करण्याच्या दृष्टीने आता सर्व बँकांसाठी एकच वेबसाईट ही संकल्पना प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर आहे. यामुळे आवश्यक असल्याशिवाय बँकेत जाण्याचे कारण नाही किंवा दोन-चार खात्यांचे इंटरनेट युझर आयडी आणि पासवर्डही लक्षात ठेवण्याची गरज भासणार नाही. २०१५मध्ये मार्चपूर्वी ही वेबसाईट प्रत्यक्षात येणार असून, यामुळे बँकिंग व्यवहार अधिक सुलभ होतील असे मानले जात आहे.
नुकतीच काही खासगी बँकांनी ही सुविधा प्रायोगिक पातळीवर सुरू केली आहे. मात्र, रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली आता नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून एका अभिनव वेबसाईटची निर्मिती सुरू झाली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ग्राहकाला या वेबसाईटवरून अकाउंटमधील बॅलेन्स तपासणे, बिल भरणा करणे किंवा त्याच्याच एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे जमा करणे अशा प्राथमिक सुविधा देण्यात येतील.