औरंगाबाद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या जिल्हा टंचाई आढावा बैठकीला भाजपा वगळता, इतर पक्षांच्या लोकप्रतिनिधींना निमंत्रणच नसल्याने ‘ही भाजपाची बैठक’ होती का, असा सवाल शिवसेनेसह इतर पक्षाच्या आमदारांनी केला आहे.दुष्काळासारख्या संवेदनशील विषयावर उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी घाईघाईने आढावा बैठक आयोजित केली. ९ आॅक्टोबरच्या रात्री १० वाजेपर्यंत बैठकीची कुणालाही माहिती नव्हती. मात्र, भाजपाच्या गोटात या बैठकीची माहिती पूर्वीपासूनच होती. त्यामुळे भाजपाचे आ. प्रशांत बंब, आ. अतुल सावे व एमआयएमचे आ. इम्तियाज जलील हे बैठकीला हजर होते. सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेच्या आमदारांना बोलावण्याची गरज त्यांना वाटली नसावी, असा टोला शिवसेना आ.संजय शिरसाट यांनी लगावला. मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींची बैठक घेणे गरजेचे होते, असे राष्ट्रवादीचे आ.भाऊसाहेब चिकटगावर म्हणाले. संवेदनशील मुद्द्यावर नोकरशाहीच्या जिवावर बैठक घेऊन निर्णय होतात. अधिकाऱ्यांच्या फिडबॅकवर जर मुख्यमंत्री निर्णय घेणार असतील, तर हे राज्याचे दुर्दैव आहे, असेआ. सतीश चव्हाण म्हणाले. बैठकीला खासदार म्हणून निमंत्रण नव्हते. पालकमंत्री आल्याने जावे लागले. बैठकीत भाजपाचे लोकप्रतिनिधी लोढणे म्हणून शिरले, असा आरोप खा.चंद्रकांत खैरे यांनी केला.
दुष्काळाच्या बैठकीला फक्त भाजपाचेच लोकप्रतिनिधी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 01:50 IST