Only the author will find answers to the disturbing violent environment. Bhalchandra Nemaade | अस्वस्थ करणाऱ्या हिंसक वातावरणावर लेखकच उत्तर शोधतील- डॉ. भालचंद्र नेमाडे

अस्वस्थ करणाऱ्या हिंसक वातावरणावर लेखकच उत्तर शोधतील- डॉ. भालचंद्र नेमाडे

जळगाव : राज्यात वाढत्या अत्याचारांच्या घटनांमुळे मुली, स्त्रियांना वाईट दिवस आले आहेत. एवढे समाजशास्त्रज्ञ असूनदेखील यावर उपाय कसा सापडत नाही, असा रोखठोक प्रश्न ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी जळगावात उपस्थित केला. देशात, राज्यात जाती-धर्माच्या नावावर वाढणारी अस्वस्थता, महिलांवरील अत्याचार, वाढती स्त्री भ्रूण हत्या या सारख्या हिंसक वातावरणावर केवळ लेखकच उत्तर शोधू शकतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलाल जैन यांच्या स्मृतिदिनी जैन इरिगेशनची सेवाभावी संस्था भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे दिल्या जाणाºया साहित्य आणि कला पुरस्कारांचे वितरण मंगळवारी सायंकाळी जैन हिल्सवरील गांधीतीर्थ येथील कस्तुरबा सभागृहात झाले. डॉ. नेमाडे अध्यक्षस्थानी होते.

डॉ. नेमाडे यांच्यासह उद्््घाटक म्हणून कविवर्य ना. धों. महानोर, प्रमुख अतिथी म्हणून संघपती दलुभाऊ जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, पुरस्कार्थी शिल्पकार राम सुतार, मेघना पेठे, अजय कांडर, रफिक सूरज उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात मराठा बाणा निर्माण करणाºया मलिकांबर ज्या धर्माचा होता त्याच मुस्लीम धर्मीय बांधवांना देशात अस्वस्थ वाटणे म्हणजे आपल्याला लाज वाटण्यासारखा प्रकार आहे, असे परखड मत डॉ. नेमाडे यांनी सध्याच्या परिस्थितीवर व्यक्त केले.

कायदाच असा हवा की, स्त्रियांच्या शीलावर अतिक्रमण होत असेल तर तिने संबंधितांना मारुन टाकावे. त्यामुळे अशा घटनांना आळा बसू शकेल. पूर्वी घरात महिलांची संख्या अधिक असायची. आम्हीदेखील महिलांसोबत वाढलो. मात्र आज स्त्रियांचीच संख्या कमी झाली आहे. सुशिक्षित, श्रीमंतांमध्ये स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण वाढत असून हा प्रकार कधी आदिवासी बांधवांमध्ये सापडणार नाही, असे स्पष्ट मत व्यक्त त्यांनी व्यक्त केले.

सध्या महिलांवरील अत्याचाराचे मूळ म्हणजे मुलींची कमी होणारी संख्या असून कायदा सुव्यवस्थेसह पोलीस, सैन्य दलात महिलांना अग्रक्रमाने स्थान दिले पाहिजे, असेही त्यांनी सुचविले.

पुरस्कार विजेते
भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे पहिला व्दिवार्षिक ‘कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव पुरस्कार’ जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार (गोंदूर, धुळे) यांना देण्यात आला. दोन लाख रुपये, सन्मानचिन्ह, शाल श्रीफळ आणि ग्रंथसंपदा असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

श्रेष्ठ लेखिका म्हणून बहिणाई पुरस्कारासाठी मेघना पेठे (बाणेर-पुणे), श्रेष्ठ कवी म्हणून बालकवी ठोमरे पुरस्कारासाठी अजय कांडर (कणकवली, जि.सिंधुदुर्ग) तर श्रेष्ठ गद्यलेखक म्हणून ना. धों. महानोर पुरस्कारासाठी रफिक सूरज (हुपरी, जि. कोल्हापूर) यांना वितरीत करण्यात आला. प्रत्येकी एक लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि ग्रंथसंपदा असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

रोखठोक
डॉ. भालचंद्र नेमाडे
मुस्लीम बांधवांना अस्वस्थ वाटणे सर्वांसाठी लाज वाटणारा प्रकार
महिलांच्या शीलावर अतिक्रमण झाल्यास मारुन टाकावे, असा कायदा हवा
सुशिक्षितांमध्ये वाढतेय स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण

Web Title: Only the author will find answers to the disturbing violent environment. Bhalchandra Nemaade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.