केवळ १० टक्के टोलमुक्ती!
By Admin | Updated: April 11, 2015 04:10 IST2015-04-11T04:10:45+5:302015-04-11T04:10:45+5:30
राज्यातील १२ टोलनाके कायमस्वरूपी बंद, तर ५३ टोलनाक्यांवर कार, जीप आणि एसटी बसेस टोलमुक्त करण्यात येत आहेत, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली
केवळ १० टक्के टोलमुक्ती!
मुंबई : राज्यातील १२ टोलनाके कायमस्वरूपी बंद, तर ५३ टोलनाक्यांवर कार, जीप आणि एसटी बसेस टोलमुक्त करण्यात येत आहेत, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या ३१ मेच्या मध्यरात्री १२ वाजल्यापासून करण्यात येणार आहे. मात्र, मुंबई आणि कोल्हापुरातील बहुचर्चित नाक्यांबाबतचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला. राज्यात सध्या एकूण १२० टोलनाके असून, त्यापैकी फक्त १२ टोलनाके बंद करण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील ४० नाक्यांवरील टोलचा निर्णय केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे.
टोलमुक्त महाराष्ट्राची घोषणा करत सत्तेवर आलेल्या भाजपा-शिवसेना सरकारने आश्वासनाची पूर्तता अवघ्या पाच महिन्यांत केली, असे मुख्यमंत्री म्हणाले. टोलमुक्त नाक्यांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राज्य रस्ते विकास महामंडळ या दोन्हींच्या नाक्यांचा समावेश आहे. त्यात बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्वावर उभारण्यात आलेल्या प्रकल्पांच्या मोबदल्याची रक्कम ही टोल कंत्राटदारासोबत केलेल्या करारनाम्यातील अटी व शर्तींनुसार राज्य शासनाच्या तिजोरीतून देण्यात येणार आहे.
कायमस्वरूपी बंद करण्यात आलेल्या नाक्यांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे ११ आणि रस्ते महामंडळाच्या अखत्यारीतील १ नाका आहे. तर कार, जीप आणि एसटी बसेसना टोलमुक्ती मिळालेले बांधकाम विभागाचे २७ तर महामंडळाचे २६ नाके आहेत. (विशेष प्रतिनिधी)