अवयवदानाची आॅनलाइन नोंदणी
By Admin | Updated: August 22, 2016 02:55 IST2016-08-22T02:55:45+5:302016-08-22T02:55:45+5:30
अवयवांची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांची संख्या आणि दात्यांची संख्या यांचे प्रमाण व्यस्त आहे.

अवयवदानाची आॅनलाइन नोंदणी
मुंबई : अवयवांची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांची संख्या आणि दात्यांची संख्या यांचे प्रमाण व्यस्त आहे. अनेक गरजू रुग्णांना अवयवांसाठी प्रतीक्षा यादीत अधिक काळ ताटकळत राहावे लागत आहे. आणि दुसरीकडे ब्रेनडेड व्यक्तींचे निदान होत नाही. याच्यात समन्वय साधण्यासाठी अवयवदानाविषयी जनजागृती करण्याचे महाअभियान आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाने हाती घेतले आहे. या अभियानांतर्गत ३० आॅगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत अवयवदानाची आॅनलाइन नावनोंदणी करण्यात येणार आहे.
अवयवदान जागृती महाअभियानाच्या शासकीय लोगोचे अनावरण गुरुवारी करण्यात आले. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले, महाअवयवदान अभियानाच्या जनजागृतीसाठी वैद्यकीय शिक्षण विभागासह सार्वजनिक आरोग्य विभाग व उच्च व तंत्रशिक्षण विभाग यांच्यामार्फत विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. यासाठी महसूल, गृह व माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय यांचेही सहकार्य घेण्यात येणार आहे. अवयवदानाबाबत प्रबोधन करून जास्तीत जास्त इच्छित दात्यांना संपर्क करून समाजात याबाबत जागृती निर्माण करण्याचे तसेच अवयवदानाच्या जास्तीत जास्त नोंदणीचे उद्दिष्ट साध्य
करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अभियानाचे व्यापक नियोजन करण्यासाठी राज्यस्तरीय समितीसह विभागीय समिती, जिल्हा आणि तालुका समितीही स्थापन करण्यात आली आहे. जिल्हा व तालुका स्तरावर मंगळवार, ३० आॅगस्ट रोजी शुभारंभ आणि अवयवदान जागृती महारॅलीचे आयोजन केले आहे.