पोलिसाने लाच मागितल्याने लातूरमध्ये एकाची आत्महत्या
By Admin | Updated: October 7, 2015 09:46 IST2015-10-07T09:42:59+5:302015-10-07T09:46:00+5:30
भावासोबत सुरू असलेला जमिनीचा वाद सोडवण्यासाठी पोलिसांनीच ५० हजारांची लाच मागितल्याने एका इसमाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना लातूरमध्ये घडली.

पोलिसाने लाच मागितल्याने लातूरमध्ये एकाची आत्महत्या
>ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. ७ - भावासोबत सुरू असलेला जमिनीचा वाद सोडवण्यासाठी पोलिसांनीच ५० हजारांची लाच मागितल्याने एका इसमाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना लातूरमध्ये घडली आहे. संभाजी वाघमोडे असे मृताचे नाव असून तो लातूरमधील चाकूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतल्या नागेशवाडी गावचा रहिवासी आहे. आत्महत्या करण्यापूर्वी लिहीलेल्या चिठ्ठीत संभाजीने पोलिसांनी लाच मागितल्याचे नमूद करत ते देणे शक्य नसल्यानेच आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे म्हटले आहे.
संभाजी व त्याच्या भावाचा जमीन वाटणीवरून वाद सुरू होता, हे प्रकरण पोलिसातही गेले होते. ५० हजार रुपये दिलेस तर हे प्रकरण सोडवून देतो, असे एका पोलिस कर्मचा-याने संभाजीला सांगितले. मात्र एवढे पैसे देणे शक्य नसल्याने निराश झालेल्या संभाजीने गळफास लावत आत्महत्या केली. पण जीव देण्यापूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहीत पोलिसाने लाच मागितल्यानेच आपण आत्महत्या करत असल्याचा उल्लख केला आहे. पोलिसाचे नाव स्पष्ट लिहीलेले असतानाही पोलिसांनी एफआयआरमध्ये त्याचे नाव नोंदवण्यास नकार दिल्याचा आरोप करत संभाजीच्या कुटुंबियांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेतला नाही.