३१ डिसेंबरला एक सेकंद एक्स्ट्रा सेलिब्रेशन
By Admin | Updated: July 11, 2016 20:52 IST2016-07-11T20:48:48+5:302016-07-11T20:52:12+5:30
२०१६ हे लीप वर्ष असल्याने यावर्षी ३६५ ऐवजी ३६६ दिवस आले आहेत

३१ डिसेंबरला एक सेकंद एक्स्ट्रा सेलिब्रेशन
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11- २०१६ हे लीप वर्ष असल्याने यावर्षी ३६५ ऐवजी ३६६ दिवस आले आहेत. त्यातच यंदा ३१ डिसेंबर रोजी लीप सेकंद पालणार असल्याचे नुकतेच जाहीर झाल्याने २०१६ हे वर्ष एका सेकंदाने आणखी लांबणार असल्याचे खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले.
या विषयी अधिक माहिती देताना सोमण म्हणाले की, टायडल फोर्समुळे आणि इतर कारणांमुळे पृथ्वीचा स्वत: भोवती फिरण्याचा वेग मंदावत आहे. त्यामुळे अगदी अचूक वेळ दाखविणाऱ्या आधुनिक आण्विक घड्याळाची वेळ आणि प्रत्यक्ष पृथ्वीची स्थिती यामध्ये फरक पडू लागतो. हा फरक वाढला की मग आण्विक घड्याळाच्या वेळेत ३० जून किंवा ३१ डिसेंबर रोजी एक सेकंद वाढवून पृथ्वीची स्थिती आणि आण्विक घड्याळातील वेळ यात मेल घातला जातो. यालाच लीप सेकंद असे म्हणतात.
३१ डिसेंबर २०१६ रोजी लीप सेकंद धरण्यात येणार असल्याचे यू. एस. नेव्हल वेधशाळेचे डॉ. जेआॅफ चेस्टर यानी नुकतेच जाहीर केले. १९७२ पासून या वर्षांपर्यंत एकूण २७ वेळा लीप सेकंद पाळले गेल्याचेही सोमण यानी सांगितले. यापूर्वी ३० जून २०१५ रोजी लीप सेकंद धरण्यात आला होता.