वन रँक-वन पेन्शनची अंमलबजावणी

By Admin | Updated: April 8, 2016 01:13 IST2016-04-08T01:13:43+5:302016-04-08T01:13:43+5:30

लष्करातील २७ लाखांपैकी एकूण २६ लाख निवृत्तिवेतन धारकांना ‘वन रँक-वन पेन्शन’प्रमाणे पेन्शन देण्यास सुरुवात झाली आहे.

One Rank-One Pension Implementation | वन रँक-वन पेन्शनची अंमलबजावणी

वन रँक-वन पेन्शनची अंमलबजावणी

पुणे : केंद्र शासनाच्या वन रँक-वन पेन्शन या योजनेवर लष्कराकडून युद्धपातळीवर काम सुरू झाले आहे. लष्करातील २७ लाखांपैकी एकूण २६ लाख निवृत्तिवेतन धारकांना ‘वन रँक-वन पेन्शन’प्रमाणे पेन्शन देण्यास सुरुवात झाली आहे.
उर्वरित एक लाख निवृत्तिवेतन धारकांच्या पेन्शनमध्ये काही त्रुटी असून, पुढील दोन महिन्यांत त्या पूर्णपणे दूर करण्यात येतील, अशी माहिती लष्कराच्या निवृत्तिवेतन विभागाचे प्रधान नियंत्रक डॉ. जी. डी. पुंगळे यांनी दिली. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पेन्शन अदालतीसाठी डॉ. पुंगळे उपस्थित होते, त्या वेळी ते बोलत होते.
पुंगळे म्हणाले, ‘‘मागील ६ महिन्यांपासून अलाहाबाद येथे लष्कराचे ५० लेखनिक ‘वन रँक-वन पेन्शन’संदर्भात काम करीत आहेत. शासनाने योजना जाहीर केल्यानंतर आत्तापर्यंत एकूण निवृत्तिवेतनाच्या ९० टक्क्यांहून अधिक लाभार्थ्यांना ‘वन रँक-वन पेन्शन’प्रमाणे पेन्शन जमा होण्यास सुरुवात झाली आहे. उर्वरित अधिकाऱ्यांच्या पेन्शनच्या मोजणीमध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत.’’
अद्यापही ‘वन रँक-वन पेन्शन’ लागू झालेली नाही, असे एकूण ३५ हजारांच्या दरम्यान निवृत्तिवेतन धारक आहेत. मात्र, लष्कराकडून त्या दृष्टीने योग्य ती पावले उचलण्यात येत असून, त्यांना लवकरच ओआरओपीप्रमाणे पेन्शन मिळण्यास सुरूवात होईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. भारतीय शासनाने ओआरओपीच्या प्रश्नांची मागील काही काळात अत्यंत गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यानुसार सहा महिन्यांपासून प्रत्येक निवृत्तिवेतन धारकाच्या खात्याची पुनर्रचना करण्यात आली असून, वन रँकप्रमाणे पेन्शन देण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे अनेक वर्षांपासून असलेला वन रँक-वन पेन्शनचा मुद्दा निकाली निघाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: One Rank-One Pension Implementation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.