मराठवाड्यातल्या धरणांमध्ये राहिला अवघा 1 टक्के पाणीसाठा
By Admin | Updated: May 23, 2016 16:06 IST2016-05-23T16:06:35+5:302016-05-23T16:06:35+5:30
मराठवाड्यामध्ये दुष्काळानं तीव्र रूप धारण केलं असून संपूर्ण मराठवाड्यातल्या धरणांमध्ये अवघा एक टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

मराठवाड्यातल्या धरणांमध्ये राहिला अवघा 1 टक्के पाणीसाठा
>ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 23 - मराठवाड्यामध्ये दुष्काळानं तीव्र रूप धारण केलं असून संपूर्ण मराठवाड्यातल्या धरणांमध्ये अवघा एक टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. परिणामी मराठवाड्यातली जनता पावसाकडे डोळे लावून बसली आहे. औरंगाबादचे डिव्हिजनल कमिशनर उमाकांत दांगट यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रांतातली सगळी धरणं तळाला गेली असून फक्त एक टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
भूगर्भातल्या पाण्याचा वापर सध्या करण्यात येत असल्याचे दांगट म्हणाले. हवामान खात्याने यंदा चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला असून पाऊस येईपर्यंत आम्ही तग धरू शकू अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. आम्ही विहीरी व बोअर वेल्स ताब्यात घेतल्या असून त्यामधून पाण्याचा उपसा करण्यात येत आहे, असं दांगट म्हणाले. त्याचप्रमाणे जवळपास 3,600 टँकर सध्या रस्तावर असून त्यांच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त गावांना पाणी पुरवण्यात येत आहे. जायकवाडी धरणातून औरंगाबादला जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पाणी पुरवता येईल असं सांगताना तोपर्यंत पाऊस पडेल अशी आशा असल्याचे दांगट म्हणाले.
गेल्या पाच वर्षात चार वर्षे मराठवाड्याने दुष्काळाची बघितली आहेत. परिणामी या प्रदेशातल्या तब्बल 8,522 गांवांना सलग दुसऱ्या वर्षी दुष्काळाचा सामना करावा लागला आहे. लातूरसारख्या शहराला तर ट्रेनने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. बीड, लातूर, उस्मानाबाद आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये 400 चारा छावण्या उभारण्यात आल्या असून त्यांच्या माध्यमातून जनावारांना दाणा-पाण्याची सोय करण्यात येत आहे.