कुत्र्यास ठार केल्यावरून एकाचा खून : तिघांना अटक
By Admin | Updated: May 25, 2016 23:50 IST2016-05-25T23:10:01+5:302016-05-25T23:50:07+5:30
पाळलेल्या कुत्र्यास विषारी औषध खाऊ घातल्याच्या कारणावरून उद्भवलेला वाद विकोपास गेला आणि त्याचे पर्यवसान भांडणात झाले.

कुत्र्यास ठार केल्यावरून एकाचा खून : तिघांना अटक
ऑनलाइन लोकमत
कुही (नागपूर), दि. 25 - पाळलेल्या कुत्र्यास विषारी औषध खाऊ घातल्याच्या कारणावरून उद्भवलेला वाद विकोपास गेला आणि त्याचे पर्यवसान भांडणात झाले. याचा वचपा घेण्यासाठी तिघांनी घरी खाटेवर झोपलेल्या व्यक्तीवर धारदार शस्त्राने वार करीत त्याला गंभीर जखमी केले. त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना कुही तालुक्यातील वेलतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या डोंगरमौदा येथे मंगळवारी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली.
परमानंद विश्वनाथ सोमकुवर (४१, रा. डोंगरमौदा, ता. कुही) असे मृताचे तर संतन कार्तिक शेंडे (३२), भीमराव अभिमन्यू गोंडाने (५०) व हरी देवराव गोस्वामी (३९) तिघेही रा. डोंगरमौदा, ता. कुही अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. परमानंद सोमकुवर यांच्या पाळीव कुत्र्यास कुणीतरी विषारी पदार्थ खायला घातले. त्यामुळे कुत्र्याचा तडफडून मृत्यू झाला. परिणामी, परमानंद आणि भीमराव गोंडाने याची पत्नी यांच्यात भांडणही झाले.
स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी करून सदर भांडण मिटविले. दरम्यान, परमानंद हा नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री त्याच्या घरी खाटेवर झोपला होता. त्यात संतन, भीमराव व हरी हे तिघेही त्याच्या घरावर चालून आले. काही कळण्याच्या आत तिघांनी परमानंदवर गुप्ती व चाकून्े वार करायला सुरुवात केली. यात गंभीर जखमी झाल्याने परमानंदचा घटनास्थळीच मृत्यू झाला. माहिती मिळताच वेलतूर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेतला आणि उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. या प्रकरणी वेलतूर पोलिसांनी अक्षय शिवाजी मेश्राम, रा. डोंगरमौदा याच्या तक्रारीवरून भादंवि ३०२, ३४ अन्वये गुन्हा नोंदवून तिन्ही आरोपीस अटक केली.