राज्यातील दीड लाख लोकांचे जगणे झाले 'जीवनदायी'

By Admin | Updated: November 19, 2014 23:14 IST2014-11-18T22:59:29+5:302014-11-19T23:14:15+5:30

राजीव गांधी आरोग्य योजना : कोल्हापूर चौथ्या क्रमांकावर, वर्षभरात १२ हजार १३८ रुग्णांची सेवा

One lakh people live in the state | राज्यातील दीड लाख लोकांचे जगणे झाले 'जीवनदायी'

राज्यातील दीड लाख लोकांचे जगणे झाले 'जीवनदायी'

गणेश शिंदे - कोल्हापूर --राजीव गांधी आरोग्य योजना : कोल्हापूर चौथ्या क्रमांकावर, वर्षभरात १२ हजार १३८ रुग्णांची सेवाउपचारासाठी पैसे नाहीत म्हणून एखाद्यावर मृत्यूला जवळ करण्याची वेळ येऊ नये म्हणून काँग्रेस आघाडी सरकारने सुरू केलेल्या ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजने’मुळे राज्यातील तब्बल दीड लाख रुग्णांचे प्राण वाचले आहेत. शासनाने त्यांच्यावर सुमारे चारशे कोटी रुपये खर्च केले आहेत. योजनेबाबत काही त्रुटी जरुर असल्या तरी त्याचा फायदा गोरगरिबांना होत आहे. या योजनेला गुरुवारी (दि. २० नोव्हेंबर) एक वर्ष पूर्ण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर या योजनेचा लेखाजोखा ‘लोकमत’ने तपासला.
या योजनेत कोल्हापूर जिल्हा राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे. वर्षात राज्यात १२ हजार १३८ रुग्णांवर तब्बल ३४ कोटी ७० लाख ३४ हजार रुपये खर्च झाले. सर्वाधिक मुंबईमध्ये १९ हजार ५१६ रुग्णांवर ६४ कोटी ६३ लाख ९५ हजार; तर कमीमध्ये नंदूरबार जिल्ह्याचा नंबर लागतो. नंदूरबारमध्ये वर्षभरात केवळ ६५ रुग्णांवर सात लाख ९५४ रुपये खर्च झाले आहेत. अडीच वर्षांपूर्वी काँग्रेस सरकारने राज्यात सर्वप्रथम रायगड, सोलापूर, नांदेड, गडचिरोली, मुंबई, मुंबई उपनगर या जिल्ह्यात ही योजना सुरू केली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित २७ जिल्ह्यांत २० नोव्हेंबर २०१३ पासून ती सुरू झाली. राज्यात वर्षभरात एकूण एक लाख ५२ हजार २५५ रुग्णांवरील उपचारांसाठी ३९७ कोटी ९७ लाख रुपये खर्च झाले. ही सेवा देणाऱ्या रुग्णालयांना एक लाख ५९ रुग्णांचा परतावा म्हणून नॅशनल इन्श्युरन्स कंपनीकडून २४७ कोटी २७ लाख रुपये मिळाले. या योजनेमधून कुटुंबातील एकाला दीड लाख रुपये खर्च मिळतो. किडनी प्रत्यारोपणासाठी अडीच लाखांची तरतूद राज्य शासनाने केली आहे. कोल्हापूर शहरातील २३ रुग्णालये, गडहिंग्लज, महागाव, जयसिंगपूर, इचलकरंजी व वडगाव प्रत्येकी एक अशा २८ रुग्णालयांत ही सेवा सुरू झाली.

करवीर आघाडीवर, तर गगनबावडा पिछाडीवर...
करवीर तालुका विधानसभा निवडणुकीच्या मतदानाबरोबर या योजनेमध्ये करवीर तालुका आघाडीवर असल्याचे खर्चाच्या आकडेवारीवरून दिसून येते. करवीरमध्ये ३८५१ रुग्णांवर दहा कोटी ३७ लाख २९ हजार ६७५ रुपये, तर गगनबावडा तालुक्यात सर्र्वाधिक कमी म्हणजे केवळ ३४ लाख २५ हजार ८०० रुपये ९३ रुग्णांवरील उपचारांसाठी खर्च झाले आहेत. दरम्यान, ग्रामीण भागात याचा फायदा होत असल्याने रुग्णालयांची संख्या वाढवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

कॅन्सर, डायलेसिस रुग्णांवर सर्वाधिक उपचार
या योजनेत ९७१ विविध आजारांवर उपचार करता येतात. कार्डियाक (हृदयरोग, हृदयविकार) ,किडनी (मूत्रपिंड), स्त्रियांचे आजार, फुप्फुस, आदी आजारांचा यांत समावेश आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कॅन्सर (कर्करोग) व डायलेसिसचे सुमारे १२००, तर जननमूत्र (किडनी स्टोन) ८००, कार्डियाक ७०० अशा रुग्णांनी उपचार घेतले आहेत. त्याचबरोबर बर्न (भाजून जखमी) सुमारे २५ , मेंदू / हाडाचे विकार ६०, डोळ्यांच्या विकारांचे शंभर, तर लहान मुलांच्या शस्त्रक्रियेवरील उपचार दीडशेजणांनी घेतले आहेत.

राज्यात पहिल्या पाचमध्ये जिल्ह्याचा क्रमांक आला, ही बाब गौरवास्पद आहे. याचे कारण म्हणजे, या योजनेबाबत झालेली जनजागृती होय.
- डॉ. अशोक देठे, जिल्हा समन्वयक,
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना, कोल्हापूर.

Web Title: One lakh people live in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.