‘सनातन’वर बंदीसाठी एक लाख सह्यांची मोहीम
By Admin | Updated: September 21, 2015 00:34 IST2015-09-21T00:16:15+5:302015-09-21T00:34:18+5:30
पुरोगामी संघटना : शिवाजी चौकात जोरदार निदर्शने, घोषणाबाजी

‘सनातन’वर बंदीसाठी एक लाख सह्यांची मोहीम
कोल्हापूर : ‘सनातन’ संघटनेवर बंदी घालण्यात यावी, या मागणीसाठी शहीद गोविंद पानसरे समता संघर्ष समिती आणि समविचारी पक्ष संघटनांतर्फे शिवाजी चौकात रविवारी जोरदार निदर्शने करण्यात आली़ ‘सनातन’वर बंदी घातलीच पाहिजे, ‘आरएसएस’ चले जाव, मुख्यमंत्री जवाब दो, अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली़ याप्रसंगी ‘सनातन’वर बंदी घालण्यासाठी एक लाख लोकांच्या सह्यांची मोहीम ज्येष्ठ नेते प्रा़ एऩ डी़ पाटील यांच्या हस्ते सुरू करण्यात आली़ दुपारी चार वाजता निदर्शनास प्रारंभ झाला़ यावेळी ‘शहीद पानसरे अमर रहे, गोडसे प्रवृत्ती मुर्दाबाद’ अशा घोषणा देण्यात आल्या़ पानसरे खूनप्रकरणी ‘सनातन’चा कार्यकर्ता समीर गायकवाड या संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे़ गायकवाडला अटक होऊन आठवडा होत आला तरी या संघटनेबाबत मुख्यमंत्री भूमिका का जाहीर करत नाहीत याचे उत्तर द्यावे, असा सवालही निदर्शकांनी विचारला़ या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करावे, अशी मागणी करण्यात आली़
यावेळी ‘सनातन’वरील बंदीसाठी मुख्यमंत्र्यांना देण्यात येणाऱ्या निवेदनावर शेकडो पुरोगामी कार्यकर्त्यांनी सह्या केल्या़ या निदर्शनांत उदय नारकर, अतुल दिघे, एस़ बी़ पाटील, शिवाजीराव कदम, अनिल चव्हाण, व्यंकाप्पा भोसले, चंद्रकांत यादव, रघुनाथ कांबळे, प्राचार्य टी़ एस़ पाटील, सुभाष वाणी, सतीशचंद्र कांबळे, बाबूराव कदम, सुरेश शिपूरकर, नामदेव गावडे, मीना चव्हाण, मेघा पानसरे, प्रकाश ठाकूर, उमेश सूर्यवंशी, के. डी़ खुर्द, आशा कुकडे, सुवर्णा तळेकर, गिरीश फोंडे, उमेश पानसरे, विजय अकोळकर, रमेश वडणगेकर, आदींनी सहभाग घेतला़
‘सनातन’वरील बंदीची मागणी पुरोगामी जनता करत आहे़ याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी या संघटनेवरील बंदीबाबत आपली भूमिका मांडावी़ बंदीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा़ पोलीस राष्ट्राचे सेवक आहेत़ पानसरेंप्रकरणी पोलीस करत असलेल्या तपासकामावर आमचा विश्वास आहे़ त्यांच्या तपासकामात राजकीय हस्तक्षेप केला जाऊ नय़े
- एऩ डी़ पाटील, ज्येष्ठ नेते