पंढरीकडे जाणारा वारकऱ्यांचा ट्रक उलटून नाशिकचा एक ठार : ४५ जखमी
By Admin | Updated: July 8, 2016 17:28 IST2016-07-08T17:28:46+5:302016-07-08T17:28:46+5:30
सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातील जेऊरजवळ गुरुवारी (दि़७) मध्यरात्री उलटला़ यामध्ये नाशिकचे वारकरी मोतीराम शिंदे(आभाळाची वाडी) यांचा जागीच मृत्यू झाला

पंढरीकडे जाणारा वारकऱ्यांचा ट्रक उलटून नाशिकचा एक ठार : ४५ जखमी
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. ८ : पंढरपूरहून विठ्ठलाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या वारकऱ्यांचा ट्रक सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातील जेऊरजवळ गुरुवारी (दि़७) मध्यरात्री उलटला़ यामध्ये नाशिकचे वारकरी मोतीराम शिंदे(आभाळाची वाडी) यांचा जागीच मृत्यू झाला असून सुमारे ४५ वारकरी जखमी झाले आहेत़ नाशिकजवळील गंगापूर गावच्या दिंडीतील हे सर्व वारकरी असून यातील किसन शिंदे (गंगापूर गाव, नाशिक) यांची प्रकृती गंभीर आहे़ दरम्यान, जखमींवर सोलापूर जिल्ह्यातील कोरेगाव तसेच अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत़
नाशिकजवळील गंगापूर गावातून दरवर्षी पंढरपूरसाठी दिंडी जाते़ गंगापूर गावातील ११ नंबरच्या या दिंडीत सुमारे ४५ वारकरी सामील झाले होते़ करमाळ्याजवळून विठ्ठलाच्या दर्शनासाठी हे सर्वजण ट्रकमध्ये गेले होते़ पंढरपूरहून परतत असताना मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास ट्रक उलटला़ यामध्ये मोतीराम शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला तर किसन शिंदे हे गंभीर जखमी झाले आहे़ ट्रकमधील वारकऱ्यांपैकी सुमारे १८ वारकऱ्यांच्या हाता-पायाला फॅक्चर झाले असून उर्वरित किरकोळ जखमी झाले आहेत़
या जखमी वारकऱ्यांपैकी २५ वारकऱ्यांवर सोलापूर जिल्ह्यातील कोरेगाव येथे तर १५ वारकऱ्यांवर अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले़ अहदमनगर रुग्णालयातील जखमींना नाशिकला हलविण्यात आले असून कोरेगाव येथील जखमींनाही लवकरच नाशिकला हलविण्यात येणार आहे़ दरम्यान, या अपघातात मृत्युमुखी पडलेले मोतीराम शिंदे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून नाशिकला पाठविण्यात आला आहे़