सोलापूरमध्ये काँग्रेसच्या बैठकीत हाणामारी, एकजण जखमी
By Admin | Updated: May 24, 2014 00:00 IST2014-05-23T22:45:32+5:302014-05-24T00:00:54+5:30
माजी परिवहन समिती सभापती केशव इंगळे यांच्या डोक्यात खुर्ची घातल्याने ते जखमी झाले तर पोलिसालाही मारहाण करण्यात आली.

सोलापूरमध्ये काँग्रेसच्या बैठकीत हाणामारी, एकजण जखमी
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघात सुशीलकुमार शिंदे यांच्या पराभवामुळे बोलाविलेल्या आत्मचिंतन बैठकीत काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी निवडणुकीतील अपयशाचे खापर एकमेकांवर फोडत गोंधळ घातला. माजी परिवहन समिती सभापती केशव इंगळे यांच्या डोक्यात खुर्ची घातल्याने ते जखमी झाले तर पोलिसालाही मारहाण करण्यात आली.
शिंदे यांचा लोकसभा निवडणुकीत दीड लाख मतांनी पराभव झाला. यामुळे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके यांच्यासह शहराध्यक्ष धर्मा भोसले यांच्यासह अन्य पदाधिकार्यांनी आपले राजीनामे प्रदेश कार्यकारिणीकडे पाठविले होते. या पराभवाला पक्ष संघटनेतील गटबाजी कारणीभूत असल्यामुळे यावर चर्चा करण्यासाठी काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सायंकाळी ५.३0 वा. बैठक बोलावली होती. बैठक सुरू होण्याअगोदरच शहराध्यक्ष धर्मा भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारासमोर येणार्या अन्य कार्यकर्त्यांना दमदाटी केली. काही वेळ बैठक थांबली त्यानंतर पुन्हा ती चालू झाली़
यावेळी व्यासपीठावर काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस राजन कामत, जनरल सेक्रेटरी केशव इंगळे, शहर उपाध्यक्ष अनिल मस्के, बजरंग जाधव, अशोक चव्हाण, अजय दासरी आदी ज्येष्ठ मंडळी उपस्थित होती. सभा सुरू होताच सभेतील कार्यकर्त्यांनी उठून ही सभा कशासाठी बोलावण्यात आली आहे, असा जाब विचारला. त्यावर राजन कामत यांनी साहेबांच्या पराभवामुळे आत्मचिंतन करण्यासाठी बोलावल्याचे सांगितले, तेव्हा संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी व्यासपीठाचे टेबल उचलून फेकून देण्यास सुरूवात केली. त्यानंतर तेथील खुर्च्याही फेकण्यात आल्या, फायबरच्या खुर्च्या तोडण्यात आल्या. हे होत असताना मोबाईलमध्ये चित्रीकरण करणार्या पोलीस कर्मचार्यालाही खुर्ची फेकून मारहाण करण्यात आली. अचानक गोंधळ उडाल्याने बैठक उधळण्यात आली. दरम्यान काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी केशव इंगळे यांच्या डोक्यात खुर्ची घातल्याने ते जमिनीवर पडले. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून गोंधळ घालणार्या कार्यकर्त्यांना अटक केली. त्यानंतर वातावरण शांत झाले. (प्रतिनिधी)
..
शिंदे साहेबांच्या पराभवाची कारणमिमासा करण्यासाठी आम्ही बैठक बोलावली होती. काही कार्यकर्त्यांनी आमच्यावरच आरोप करीत गोंधळ घालण्यास सुरूवात केली. काहींनी माझ्या डोक्यात खुर्ची घातली. हा प्रकार निंदणीय आहे.
-केशव इंगळे,
माजी परिवहन समिती सभापती.