शंभर रुपयांत दहावीचा पेपर; पुरावे सापडेनात
By Admin | Updated: March 12, 2015 01:23 IST2015-03-12T01:23:57+5:302015-03-12T01:23:57+5:30
पाथर्डी येथे शंभर रुपयांत बीजगणिताचा पेपर या ‘लोकमत’च्या वृत्तामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून माध्यमिक शिक्षण विभागाने दिवसभर

शंभर रुपयांत दहावीचा पेपर; पुरावे सापडेनात
अहमदनगर/पाथर्डी : पाथर्डी येथे शंभर रुपयांत बीजगणिताचा पेपर या ‘लोकमत’च्या वृत्तामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून माध्यमिक शिक्षण विभागाने दिवसभर चौकशी करून प्रश्नपत्रिकेची झेरॉक्स विक्री होत असल्याचा कोणता पुरावा उपलब्ध होत नसल्याचा अहवाल पुणे मंडळाला पाठविला आहे.
बुधवारी बारावीच्या परीक्षेतही भूगोलच्या पेपरला पाथर्डीत पाच कॉपी प्रकरणे समोर आली आहेत. जिल्हास्तरीय पाच भरारी पथके बुधवारी पाथर्डीत तळ ठोकून होती. मंगळवारी पाथर्डी तालुक्यात दहावीच्या परीक्षेदरम्यान बीजगणिताचा पेपर फुटल्याची चर्चा होती. शंभर रुपयांत बिजगणिताची प्रश्नपत्रिका विक्री होत असल्याची बातमी नगरला धडकली. शिक्षणाधिकारी सुनंदा ठुबे यांनी पाथर्डी गाठून तालुक्यातील परीक्षा केंद्र परिसरात एक किलोमीटरपर्यंतचे झेरॉक्स दुकान बंद करण्याचे पत्र पोलिसांना देण्याचे आदेश गटशिक्षणधिकाऱ्यांनी दिले. बुधवारी शिक्षणाधिकारी ठुबे यांनी बीजगणित पेपरच्या विक्रीच्या प्रकरणाचा तपास केला, मात्र त्यांना पुरावे न मिळाल्याने अखेर त्यांनी पुणे परीक्षा मंडळाला तसा अहवाल पाठविला. (प्रतिनिधी)