शिवसेनेची शेतकऱ्यांना एक कोटींची मदत
By Admin | Updated: September 12, 2015 01:20 IST2015-09-12T01:20:35+5:302015-09-12T01:20:35+5:30
शिवसेनेच्या ‘स्मृती’ संस्थेतर्फे जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त एक हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांप्रमाणे एक कोटी रुपयांच्या मदतीचे वाटप शुक्रवारी येथे एका कार्यक्रमात करण्यात आले.

शिवसेनेची शेतकऱ्यांना एक कोटींची मदत
उस्मानाबाद : शिवसेनेच्या ‘स्मृती’ संस्थेतर्फे जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त एक हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांप्रमाणे एक कोटी रुपयांच्या मदतीचे वाटप शुक्रवारी येथे एका कार्यक्रमात करण्यात आले.
मराठवाडा दुष्काळाने पिचला आहे. नापिकीला कंटाळून शेतकरी आत्महत्या करीत आहेत, मात्र यापुढे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ देणार नाही, असे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात आलेली मदत मंदिरातील तीर्थ-प्रसादाप्रमाणे आहे. मंदिरात प्रसाद मिळाल्यानंतर भाविकाला आनंद होतो, त्याच भावनेने शिवसेनेने ही मदत केली आहे, असेही रावते म्हणाले.
आरोग्यमंत्री दीपक सावंत, अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर, जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, महसूल राज्यमंत्री संजय राठोड आदी कार्यक्रमाला उपस्थित होते. ही प्रासंगिक मदत असून सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कायमस्वरूपी दिलासा देऊ. दुष्काळी परिस्थितीमुळे निराश होऊ नका. शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, अशी ग्वाही सावंत यांनी दिली. (प्रतिनिधी)