गावठी कट्ट्यासह एकाला अटक
By Admin | Updated: July 20, 2016 02:59 IST2016-07-20T02:59:46+5:302016-07-20T02:59:46+5:30
गावठी कट्टा घेवून विक्रीसाठी आलेल्या एकाला नेरुळ पोलिसांनी अटक केली आहे.

गावठी कट्ट्यासह एकाला अटक
नवी मुंबई : गावठी कट्टा घेवून विक्रीसाठी आलेल्या एकाला नेरुळ पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी रात्री नेरुळ रेल्वे स्थानक आवारात पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली आहे. झडतीमध्ये त्याच्याकडे तीन गावठी कट्टे व एक काडतूस आढळून आले.
कल्याणमधुन एक सराईत गुन्हेगार बेकायदेशीर शस्त्र घेवून नेरुळकडे येत असल्याची माहिती नेरुळ पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक अधिकराव पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सुशीलकुमार गायकवाड, वासुदेव मोरे व इतर सहकाऱ्यांच्या पथकाने सोमवारी रात्री नेरुळ रेल्वे स्थानक आवारात सापळा रचला होता. यानुसार रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास स्थानकाबाहेरील रस्त्यावर एकांतामध्ये एक संशयित तरुण पोलिसांच्या निदर्शनास आला. त्यांनी या तरुणाला अडवून त्याच्याकडील बॅगची झडती घेतली असता, त्यामध्ये तीन देशी बनावटीचे कट्टे व एक जिवंत काडतूस आढळून आले.
यानुसार त्याला अटक करून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमेश यादव (२०) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव असून तो त्याच्याकडील शस्त्र विक्रीसाठी नेरुळमध्ये आला होता. तो मूळचा आजमगडचा राहणारा आहे. कल्याण येथून रेल्वेने तो नेरुळमध्ये आला होता. त्याच्याकडील दोन कट्टे व काडतूस असा ४५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. हे शस्त्र घेवून तो कोणाला विकण्यासाठी आला होता, याचा अधिक तपास नेरुळ पोलीस करत आहेत. (प्रतिनिधी)