राज्यात साडेतीन हजार शाळा एकशिक्षकी
By Admin | Updated: October 13, 2015 04:01 IST2015-10-13T04:01:34+5:302015-10-13T04:01:34+5:30
राज्यातील तब्बल ३ हजार ५३४ शाळांतील एखादा शिक्षक सुटीवर गेला किंवा काही कारणास्तव गैरहजर राहिला तर त्या दिवशी ती संपूर्ण शाळाच बंद राहते.

राज्यात साडेतीन हजार शाळा एकशिक्षकी
पुणे : राज्यातील तब्बल ३ हजार ५३४ शाळांतील एखादा शिक्षक सुटीवर गेला किंवा काही कारणास्तव गैरहजर राहिला तर त्या दिवशी ती संपूर्ण शाळाच बंद राहते. हे जरी विचित्र वाटत असलं तरी वास्तव आहे. यू-डायसच्या अहवालानुसार राज्यातील ग्रामीण भागातील ३ हजार ५३४ प्राथमिक शाळा या एकशिक्षकी आहेत. राज्यात ४६ हजार शाळांमध्ये अद्यापही विषयानुसार शिक्षक नसल्याचे सत्य या अहवालातून स्पष्ट होत आहे.
केंद्र शासनाकडून दरवर्षी माहिती संकलनाचे काम यू-डायसच्या माध्यमातून केले जाते. त्यातून ही गंभीर परिस्थिती समोर आली आहे. २०१४-१५च्या अहवालानुसार राज्यात ९७ हजार ८४ शाळा आहेत. या शाळांमध्ये एकूण ६ लाख ५६ हजार ६७३ शिक्षक आहेत. मात्र, तरीही अनेक शाळांमध्ये शिकवण्यासाठी विषयानुरूप शिक्षक नसल्याचे दिसते. तर राज्यातील ग्रामीण भागांतील ३ हजार ५३४ शाळा या एकशिक्षकी आहेत, तर ४२ हजार ४०७ शाळा दुशिक्षकी आहेत.
राज्यातील तब्बल ८० हजार विद्यार्थी या एकशिक्षकी शाळांच्या माध्ममातून शिक्षण घेत आहेत. त्यामुळे तो एकच असणारा शिक्षक गैरहजर असल्यास वा रजेवर गेल्यास शाळा बंद करण्याशिवाय पर्यायच नसणार हे उघड आहे.
शिवाय या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्याबरोबरच इतर प्रशासकीय जबाबदारीही याच शिक्षकांना सांभाळावी लागत आहे. यातील बहुतेक शाळा सहावी ते आठवीच्या आणि ग्रामीण भागांतील आहेत. ग्रामीण भागांतील केवळ ६९ टक्के म्हणजेच ६६ हजार ९८८ शाळांमध्ये मुख्याध्यापकच नाहीत. (प्रतिनिधी)