आदिवासी चिमुकल्यांच्या शाळेसाठी एक एकर शेती दान!
By Admin | Updated: July 7, 2016 08:23 IST2016-07-07T02:43:20+5:302016-07-07T08:23:58+5:30
लोकमत प्रेरणावाट : भूमी हक्क परिषदेचे के. जी. शाह यांचा निर्णय.

आदिवासी चिमुकल्यांच्या शाळेसाठी एक एकर शेती दान!
मोताळा (जि. बुलडाणा) : तालुक्यातील माळेगाव वनग्राम येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी भूमी हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष के. जी. शाह यांनी एक एकर जमीन दान देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. शाह यांच्या दातृत्वामुळे आदिवासी वस्तीतील चिमुकल्यांच्या शाळेसाठी हक्काची जागा मिळाली आहे. माळेगाव वनग्राम येथे आदिवासी वस्तीमधील प्राथमिक शाळेच्या मुलांना मागील ७ वर्षांपासून शाळेची इमारत नाही. या ठिकाणी इयत्ता १ ली ते ४ थीपर्यंतचे २८ विद्यार्थी आहेत. त्यामुळे सोयी व सुविधांअभावी या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची परवड होत होती. ३0४ लोकसंख्या असलेल्या या आदिवासी वस्तीमध्ये सन २00७पर्यंत एक शिक्षकी वस्तीशाळा होती. सन २00८पासून वस्तीशाळेचे प्राथमिक शाळेमध्ये रूपांतर होऊन दोन शिक्षकी शाळा अस्तिवात आली. मात्र शाळेला स्वत:ची जागा नसल्याने हनुमान चावडीलगतच्या पडक्या जागेत शाळा भरत होती. मुलांची गैरसोय ध्यानी घेऊन वनहक्क दावेदार व भूमीहक्क परिषदेचे अध्यक्ष के. जी. शाह यांनी बुधवारी तहसीलदारसह गावकर्यांच्या उपस्थितीत एक एकर जमीन शाळेकरीता दान दिली.