पुणे - नेते असतात ते निवडून येतातच पण निवडून आल्यानंतर कायम लोककल्याणाचा विचार व्हायला हवा. त्यासाठी अशी क्षमता वृद्धी संमेलने उपयुक्त ठरतील, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. लोकांच्या आकांक्षा पूर्ण करताना टीका सहन करण्याचीही तयारी लोकप्रतिनिधींनी ठेवायला हवी, असेही ते म्हणाले.
‘राष्ट्रीय विधायक संमेलन, भारत’ यांच्या वतीने देशभरातील आमदारांसाठी दोनदिवसीय-क्षमता वृद्धी कार्यक्रम एमआयटी डब्ल्यूपीयू, कोथरूड, पुणे येथे झाला. त्यात फडणवीस बोलत होते. लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, ‘एनएलसी भारत’चे संस्थापक-संयोजक डॉ. राहुल कराड उपस्थित होते. सुमित्रा महाजन म्हणाल्या, की राजकारणात चांगल्या लोकांनी यायलाच हवे, आलेल्या लोकांनी आपल्या कामात सुधारणा करायलाच हवी, त्यासाठी अशी संमेलने उपयुक्त ठरतील.
विकासाचे राजकारण व्हावे, त्यातून देशाची प्रगती व्हावी, राजकीय पक्षांचा विचार निवडणुकीपुरता व्हावा, ती झाल्यावर आपण देशाचे प्रतिनिधी ही भावना निवडून आलेल्यांमध्ये तयार व्हावी, यासाठी हे संमेलन असल्याचे डॉ. राहुल कराड म्हणाले.
राजकारण सत्ताकारण नव्हे
केंद्रीय रस्ते वाहतूक दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी ऑनलाइन संदेश दिला. राजकारण म्हणजे फक्त सत्ताकारण नाही असे सांगितले. समाजाचा विकास हे मूळ ध्येय आहे. गुणात्मक परिवर्तनानेच लोकशाही सक्षम होईल, असे गडकरी म्हणाले. या संमेलनासाठी देशभरातून विविध राजकीय पक्षांचे सुमारे २०० पेक्षा जास्त आमदार आणि विविध राज्यांमधील विधानसभांचे सभापती, उपसभापती तसेच अधिकारी प्रत्यक्ष सहभागी झाले होते.