‘सवाई’मध्ये जुन्या-नव्याचा सुरेल संगम
By Admin | Updated: November 29, 2014 01:31 IST2014-11-29T01:31:50+5:302014-11-29T01:31:50+5:30
नव्या पिढीच्या नऊ कलाविष्कारांचा सुरेल संगम यंदाच्या ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’त रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.

‘सवाई’मध्ये जुन्या-नव्याचा सुरेल संगम
पुणो : संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा, गायक पं. जसराज, पं. उल्हास कशाळकर, गायिका मालिनी राजूरकर यांसारख्या संगीतातील दिग्गजांसह सुंद्री वादक भीमण्णा जाधव, श्रीवाणी जडे, सानिया पाटणकर, धनंजय देगडे, अंबी सुब्रमण्यम आदी नव्या पिढीच्या नऊ कलाविष्कारांचा सुरेल संगम यंदाच्या ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’त रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. महोत्सवात प्रथमच सादर होणारी सुरेश वाडकर यांची अभिजात संगीताची मैफल हे यंदाच्या महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.
महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची (दि. 11) सुरुवात सोलापूरचे नावाजलेले सुंद्रीवादक सूरमणी भीमण्णा जाधव यांच्या वादनाने होणार आहे. त्यानंतर जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका अश्विनी भिडे-देशपांडे यांच्या शिष्या सानिया पाटणकर यांचे गायन आणि बनारस घराण्याचे ज्येष्ठ गायक राजन-साजन मिश्र यांचे शिष्य दिवाकर-प्रभाकर कश्यप या बंधूंचे सहगायन रसिकांना ऐकता येणार आहे. पं. शिवकुमार शर्मा यांच्या संतूरवादनाच्या जादुई सुरांनी
पहिल्या दिवसाची सांगता होणार आहे.
रमाकांत गायकवाड या युवा कलाकाराच्या गायनाने दुस:या दिवशी (दि. 12)चा प्रारंभ होणार असून, दिल्लीच्या किराणा घराण्याच्या गायिका सुमित्र गुहा यांचे तसेच पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य आनंद भाटे यांचे गायन त्यानंतर सादर होईल. प्रख्यात भरतनाटय़म नृत्यांगना सुचेता भिडे-चापेकर यांचा नृत्याविष्कारही रसिकांना अनुभवायला मिळणार असून, पतियाळा घराण्याचे गायक पं. अजय पोहनकर यांच्या गायनाने
दुस:या दिवशीचा समारोप होणार आहे. (प्रतिनिधी)
महोत्सवाचे वेळापत्रक आणि कलाकारांची नावे शुक्रवारी मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी जाहीर केली.
25हून अधिक कलाकारांचा सहभाग!
नव्या आणि ज्येष्ठ कलाकारांच्या सुरेल संगमातून या वर्षीचा 62वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव, आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे 11 ते 14 डिसेंबरदरम्यान न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग येथे रंगणार आहे. महोत्सवात तब्बल 25 कलाविष्कार आणि 25हून अधिक नामवंत आणि युवा कलाकार सहभागी होणार आहेत.