ओला-उबेरबाबत आठवडाभरात हरकती
By Admin | Updated: November 15, 2016 05:26 IST2016-11-15T05:26:23+5:302016-11-15T05:26:23+5:30
ओला, उबेरसह अॅग्रीगेटर कंपन्यांव्दारे चालवण्यात येणाऱ्या टॅक्सी सेवांचे नियमन करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सिटी टॅक्सी योजना-२0१६ चा मसुदा

ओला-उबेरबाबत आठवडाभरात हरकती
मुंबई : ओला, उबेरसह अॅग्रीगेटर कंपन्यांव्दारे चालवण्यात येणाऱ्या टॅक्सी सेवांचे नियमन करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सिटी टॅक्सी योजना-२0१६ चा मसुदा तयार करण्यात आला. त्यासंदर्भात हरकती व सूचना मागवण्यात आल्यानंतर त्या शासनाकडे येत्या आठवडाभरात सादर केल्या जातील, अशी माहिती परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम यांनी दिली. परिवहन आयुक्तालयाच्या पत्त्यावर तसेच त्यांच्या ई-मेलवर जवळपास दीड हजारापर्यंत सूचना व हरकती प्राप्त झाल्या. मात्र या हरकती आणि सूचनांवर ओला, उबेर या खासगी टॅक्सी कंपन्यांनी आक्षेप नोंदवला आहे. यात महत्वाचे आक्षेप म्हणजे १,४00 सीसी आणि त्यापेक्षा जास्त क्षमतेच्या टॅक्सींची संख्या ही ५0 टक्के इतकी समान असावी अशी शिफारस असल्याने त्याला जोरदार विरोध केला आहे.
तसेच नवीन टॅक्सी परमिटसाठी दोन लाख ६१ हजार रुपये शुल्क आकारण्याची सूचनाही करण्यात आली आहे. ही रक्कम आतापर्यंत २५ हजार होती. मात्र ती वाढवण्यात येत असल्याने टॅक्सी चालकांकडून रोष व्यक्त केला जात आहे. यासंदर्भात अनेक हरकती व सूचना परिवहन आयुक्त कार्यालयाकडे प्राप्त झाल्या. त्याचा एक अहवाल तयार करुन तो शासनासमोर या आठवड्यात सादर केला जाणार असल्याचे गेडाम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)