ओल्या पार्टीत भिजले ओझर विमानतळ !
By Admin | Updated: February 2, 2015 06:14 IST2015-02-02T06:14:18+5:302015-02-02T06:14:18+5:30
संरक्षण विभागाच्या अखत्यारीतील अति संवेदनशील ओझर विमानतळ शनिवारी रात्री चक्क ओल्या पार्टीत भिजले. विशेष म्हणजे आॅर्केस्ट्रा डीजेसह रात्री उशिरापर्यंत सुरू असलेली ही पार्टी संरक्षण विभागाची नव्हती,

ओल्या पार्टीत भिजले ओझर विमानतळ !
गणेश धुरी, नाशिक
संरक्षण विभागाच्या अखत्यारीतील अति संवेदनशील ओझर विमानतळ शनिवारी रात्री चक्क ओल्या पार्टीत भिजले. विशेष म्हणजे आॅर्केस्ट्रा डीजेसह रात्री उशिरापर्यंत सुरू असलेली ही पार्टी संरक्षण विभागाची नव्हती, तर सार्वजनिक बांंधकाम विभागातील एका वरिष्ठ अधिका-याच्या सेवानिवृत्तीनिमित्त रंगल्याचे उघड झाले आहे. जानोरी ग्रामस्थांनी सुरक्षा अधिकाऱ्यांच्या कानावर हा प्रकार घातल्यानंतर पार्टी थांबविण्यात आल्याचे समजते. दिंडोरीचे खा. हरिश्चंद्र चव्हाण यांनी या पार्टीची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता पी. वाय. देशमुख यांच्या सेवानिवृत्तीसाठी हा रंगारंग कार्यक्रम आयोजित केल्याचे समजते. खास मुंबईहून मागविलेला रंगारंग आॅर्केस्ट्रा डीजेसह रात्री उशिरापर्यंत सुरू होता. रात्री सव्वानऊ वाजता संगीत रजनीतील लावण्यांचा कार्यक्रम डीजेच्या आवाजात घुमू लागला. त्यामुळे जानोरीचे सरपंच नामदेव उंबरसाडे यांनी ग्रामस्थांसह विमानतळाकडे धाव घेतली. परंतु सुरक्षारक्षकांनी परवानगी घेऊन कार्यक्रम सुरू असल्याचे सांगत त्यांना पिटाळून लावण्याचा प्रयत्न केल्याचे कळते. सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्व बडे अधिकारी, काही मक्तेदार कार्यक्रमाला उपस्थित होते तसेच रात्री दीड वाजेपर्यंत साग्रसंगीत पार्टीचा कार्यक्रम सुरू होता, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. खा. हरिश्चंद्र चव्हाण यांना घडलेला प्रकार समजताच रविवारी त्यांनी विमानतळावर धाव घेत दिंडोरीचे पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांना बोलावून घेतले. मात्र तत्पूर्वी आयोजकांनी घाईगर्दीत मद्याच्या बाटल्या व उरलेले खाद्यपदार्थ टेम्पोमध्ये भरून नेल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या ओझर विमानतळाला लागूनच नव्याने झालेल्या विमानतळावर असा कार्यक्रम कसा होऊ शकतो, असा गावकऱ्यांचा सवाल आहे.