यदु जोशीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लाडकी बहीण योजनेचा लाभ १४,२९८ पुरुषांनी घेतल्याची अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. दहा महिन्यांपर्यंत या लाडक्या पुरुषांना २१.४४ कोटी रुपयांचे वाटपही करण्यात आले. अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली. योजनेच्या लाभार्थींची छाननीत हा प्रकार उघड झाला. ऑगस्ट २०२४ मध्ये योजनेचा लाभ द्यायला सुरुवात झाली. लाभार्थींच्या यादीमध्ये १४,२९८ पुरुषही घुसले. त्यांना कोणी घुसवले, छाननी कोणी केली आणि महिलांसाठीच्या योजनेवर पुरुषांनी डल्ला मारला कसा, त्यासाठी जबाबदार कोण, असे प्रश्नही आता निर्माण झाले आहेत. सार्वजनिक वितरण प्रणालीत उपलब्ध असलेल्या डेट्याची पडताळणी केली असता, आणखीही गंभीर बाबी समोर आल्या.सरकारला लाडकी बहीण योजनेवर वर्षाकाठी ४२ हजार कोटी रुपये खर्च करावे लागतात. तत्कालिन एकनाथ शिंदे सरकारने ही योजना सुरू केली होती. विधानसभा निवडणुकीत त्याचा मोठा फायदा महायुतीला झाला होता. मात्र त्यामुळे राज्य सरकारच्या विविध विकास कामांना मोठ्या प्रमाणात फटका बसला.
पुरुष असूनही महिलांची नावे...आणखी एक धक्कादायक म्हणजे, २ लाख ३६ हजार ०१४ लाभार्थी असे आहेत की, ज्यांच्या नावांबद्दल असा संशय आहे की, पुरुष असूनही त्यांनी महिलांची नावे देऊन लाभ घेतला असावा. त्याची छाननी करण्याचे काम सध्या सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. १४,२९८ पुरुष योजनेचा लाभ घेत होते, असे निदर्शनास आल्यानंतर आता त्यांचे दरमहा १५०० रुपये मानधन बंद करण्यात आले आहे. पूर्णत: अपात्र असताना या पुरुषांना देण्यात आलेले पैसे सरकार परत घेणार का? असा प्रश्नही निर्माण झाला आहे.
लाखो ज्येष्ठ नागरिक महिलांनीही घेतला लाभ६५ वर्षे वयावरील व्यक्तींना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही, असा नियम आहे. कारण त्यांना राज्य सरकारच्या इतर योजनांचा आर्थिक लाभ दिला जातो. असे असतानाही ६५ वर्षे वयावरील २ लाख ८७ हजार ८०३ वयोवृद्ध महिलांनी या योजनेचा लाभ उचलला असे निदर्शनास आले आहे. त्यांना १० महिन्यांपर्यंत ४३१ कोटी ७० लाख रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा झाले.आता हे लाभार्थी गाळले जातील, त्यामुळे सरकारचे वर्षाकाठी ५१८ कोटी रुपये वाचणार आहेत.८ लाख कुटुंबांतील २ पेक्षा अधिक महिलांना लाभएका कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांना योजनेचा लाभ दिला जाणार नाही असा नियम असताना एकाच कुटुंबात दोनपेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतल्याची ७ लाख ९७ हजार ७५१ प्रकरणे समोर आली आहेत. अशा प्रकरणांतील महिलांना लाभार्थींच्या यादीतून वगळण्याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. पण त्यांना आतापर्यंत १,१९६ कोटी ६२ लाख रुपये मिळाले.