देहरे, सावरपाड्याचा पाणीपुरवठा बंद
By Admin | Updated: April 28, 2016 03:53 IST2016-04-28T03:53:32+5:302016-04-28T03:53:32+5:30
जव्हार तालुक्यातील देहरे, सावरपाडा, दसकोड, या ग्रामपंचायत हद्दीतील वेळेत वीज बिल न भरल्याने पाणी पुरवठा बंद झाला आहे.

देहरे, सावरपाड्याचा पाणीपुरवठा बंद
हुसेन मेमन,
जव्हार-जव्हार तालुक्यातील देहरे, सावरपाडा, दसकोड, या ग्रामपंचायत हद्दीतील वेळेत वीज बिल न भरल्याने पाणी पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे २६ एप्रिल रोजी महिलांनी जव्हार पंचायत समितीला घेराव घेतला.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने आदिवासी उपयोजना पाणी पुरवठा अंतर्गत२१ वर्षांपूर्वी पाण्यासाठी, सावरपाडा येथे टाकी बांधण्यात आली आहे. येथून या ग्रामपंचायतीतील गाव पाड्यांना पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. मात्र या योजनेसाठी वापरल्या जाणाऱ्या वीजेचे बिल न भरल्याने पाणीपुरवठा बंद झाला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आदिवासी उपयोजने अंतर्गत कोरतड, मेढा, मोचार्पाडा, डुंगणी, भांगडा, दसकोड, सावरपड़ा, पादवीपाडा, कॉलनीपाडा, देहरे, कडव्याचीमाळी, खडकी पाडा, देवगाव, जळ विहिरा, देवगाव, बोरीचापाडा, या गाव-पाड्याना जीवन प्राधिकरण आदिवासी उपयोजने अंतर्गत पिण्याचा पुरवठा केला जातो. देहरे ग्राम पाणी पुरवठा समितीने वसूली करून, लाईट बिल भरणे, देखभाल खर्च, नोकरांचा पगार, किरकोळ दुरुस्ती, हा खर्च याबाबतची माहिती ग्रामस्थांना न दाखवता केल्याचा आरोप केला गेला आहे.
देहरे, सावरपाडा, कोरतड, या ग्रामस्थांना गेल्या महिना भरापासून वीजपुरवठा खंडीत असल्याने पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे येथील महिलांना ३ ते ४ कि.मी, अंतरावर पाण्यासाठी वणवण करतात. तर विहीरींना पाणी असूनही वीजपुरवठा नसल्याने पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या पाणी योजनेची विहीरही २२ कि.मी अंतरावर आहे.