अधिकाऱ्यांना निष्काळजी भोवणार
By Admin | Updated: June 8, 2016 02:08 IST2016-06-08T02:08:44+5:302016-06-08T02:08:44+5:30
एपीएमसीमध्ये देखभाल व सुरक्षा विभागाच्या निष्काळजीपणामुळे प्रचंड अनधिकृत बांधकाम झाले आहे

अधिकाऱ्यांना निष्काळजी भोवणार
नवी मुंबई : एपीएमसीमध्ये देखभाल व सुरक्षा विभागाच्या निष्काळजीपणामुळे प्रचंड अनधिकृत बांधकाम झाले आहे. याविषयी ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर सचिवांनी मुख्य सुरक्षा अधिकारी व अधीक्षक अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पाचही मार्केटमधील अभियंत्यांच्या तत्काळ बदल्या करण्यात आल्या आहेत.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाचही मार्केटमध्ये व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम केले आहे. महापालिकेची व एपीएमसीची परवानगी न घेताच अनेक व्यापाऱ्यांनी एक मजला वाढविला आहे. वास्तविक बाजार समितीच्या पाचही मार्केटला संरक्षण भिंत आहे. प्रत्येक आवक व जावक गेटवर चोवीस तास सुरक्षा रक्षक असतात. देखभाल शाखेतील अभियंत्यांची प्रत्येक मार्केटमध्ये नियुक्ती केली आहे. या दोन्ही विभागाच्या सहमतीशिवाय बांधकाम साहित्य मार्केटमध्ये येवूच शकत नाही. यामुळे सुरक्षा व देखभाल शाखेने अभय दिल्यामुळेच मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम झाल्याचे ‘लोकमत’ने निदर्शनास आणून दिले होते. याविषयी दिलेल्या वृत्ताची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे.
अधीक्षक अभियंता व्ही. बी. बिराजदार व मुख्य सुरक्षा अधिकारी कर्नल अविनाश काकडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. संबंधितांची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित विभागप्रमुख या नोटीसला काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मार्केटमधील एकही प्रकल्प वेळेत पूर्ण केलेला नाही. याशिवाय प्रत्येक मार्केटसाठी स्वतंत्र अभियंते असतानाही व्यापाऱ्यांनी वाढीव मजल्याचे बांधकाम कसे केले, असा प्रश्न उपस्थित केला आहे. यामुळे सचिवांनी तडकाफडकी अभियंत्यांच्या बदल्या केल्या आहेत. वास्तविक सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या आस्थापना विभाग करते. परंतु अभियांत्रिकी विभागाच्या बदल्या नियमाप्रमाणे करण्याचे स्वातंत्र्य आस्थापना विभागाला नाही. अधीक्षक अभियंता कोणाची कुठे बदली करायची हे निश्चित करतात. आस्थापना शाखा फक्त बदलीचा आदेश काढण्याचे काम करत आहे.
>...तर धान्य मार्केटमध्येही अतिक्रमण
बाजार समितीमधील कांदा - बटाटा, भाजी, फळ व मसाला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. यापूर्वी मसाला मार्केटमध्ये कार्यरत असलेल्या अभियंत्यांची धान्य मार्केटमध्ये बदली केली आहे.
वास्तवित संबंधितांच्या कार्यकाळात मसाला मार्केटमध्ये वाढीव मजल्यांची कामे बिनधास्तपणे झाली. अतिक्रमण होत असताना काहीही कारवाई न करणारे अधिकाऱ्यांनी धान्य मार्केटमध्ये वर्णी लावल्याने तिथेही अतिक्रमण होण्याची शक्यता आहे.
>मुख्य सुरक्षा अधिकारी निमित्तमात्र
बाजार समिती प्रशासनाने मुख्य सुरक्षा अधिकारी अविनाश काकडे यांनाही कारणे दाखवा नोटीस पाठविली आहे. काकडे हे मुख्य सुरक्षा अधिकारी असले तरी प्रत्यक्षात सुरक्षा विभागाची प्रमुख जबाबदारी के. के. रासकर व सी. टी. पवार या दोन अधिकाऱ्यांवर सोपविली आहे.
सचिवांनी ३० आॅक्टोबरला त्याविषयी लेखी आदेश काढला आहे. सर्व मार्केट, मध्यवर्ती सुविधागृह, चेकनाके यांची जबाबदारी या दोन्ही अधिकाऱ्यांची असणार आहे.
बाजार आवारामध्ये काहीही तक्रारी आल्यास त्यांना वैयक्तिक जबाबदार धरले जाणार असल्याचा उल्लेख पत्रामध्ये होता. जर सर्व जबाबदारी दोन्ही अधिकाऱ्यांची असेल तर कारवाई किंवा कारणे दाखवा नोटीस मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांना कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.