विदर्भात रुजू न होणारे अधिकारी निलंबित होणार
By Admin | Updated: August 17, 2015 00:47 IST2015-08-17T00:47:48+5:302015-08-17T00:47:48+5:30
ज्या अधिकाऱ्यांची विदर्भात बदली होऊनही ते रुजू होत नसतील तर अशा अधिकाऱ्यांना तत्काळ प्रभावाने २४ तासांच्या आत निलंबित करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
विदर्भात रुजू न होणारे अधिकारी निलंबित होणार
भंडारा : ज्या अधिकाऱ्यांची विदर्भात बदली होऊनही ते रुजू होत नसतील तर अशा अधिकाऱ्यांना तत्काळ प्रभावाने २४ तासांच्या आत निलंबित करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. रविवारी भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाची करण्यासाठी मुख्यमंत्री आले असता वाही विश्रामगृहात घेतलेल्या आढावा बैठकीत त्यांनी हे आदेश दिले.
दुपारी गोसेखुर्द प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी गोसेखुर्द आणि बावनथडी या प्रकल्पासंदर्भात आढावा घेतला. गोसेखुर्द प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा, यासाठी राज्य सरकार गंभीर असून या प्रकल्पासाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नाही, असे सांगून प्रकल्पाच्या पुनर्वसित गावांमध्ये नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुरेसा निधी राज्य सरकार देईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सन २०१९पर्यंत कोणत्याही स्थितीत गोसेखुर्द सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येईल. प्रकल्प सिंचनक्षम होण्याच्या दृष्टीने ७०० कोटी रुपये दिले जाणार आहे. याशिवाय बावनथडी प्रकल्पासाठी १२० कोटी रुपये निधी देण्यात येईल. या दोन्ही प्रकल्पांचा थेट अहवाल पाठविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. (प्रतिनिधी)