अधिका-यांनी रेशनिंग दुकान चालवावे
By Admin | Updated: February 11, 2015 06:19 IST2015-02-11T06:19:33+5:302015-02-11T06:19:33+5:30
रेशनिंग कोट्यात केलेली कपात आणि तुटपूंजे कमिशन देत प्रशासन रेशनिंग दुकानदारांना भ्रष्टाचार करण्यास भाग पाडत असल्याचा आरोप

अधिका-यांनी रेशनिंग दुकान चालवावे
चेतन ननावरे, मुंबई
रेशनिंग कोट्यात केलेली कपात आणि तुटपूंजे कमिशन देत प्रशासन रेशनिंग दुकानदारांना भ्रष्टाचार करण्यास भाग पाडत असल्याचा आरोप मुंबई रेशनिंग दुकानदार संघटनेने केला आहे. त्यामुळे यापुढे प्रशासनाच्या अधिकाऱ्याने दुकानात बसून प्राप्त कोट्यात दुकान चालवून दाखवण्याचे खुले आव्हान संघटनेने दिले आहे.
रॉकेलच्या कोट्यात केलेली कपात आणि एपीएल धारकांचे बंद केलेले धान्य यामुळे दुकानांवर रोजच रेशनिंगकार्डधारकांसोबत खटके उडत असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष नविन मारू यांनी दिली. मारू म्हणाले, रेशनिंगकार्डधारकांना रॉकेलच्या कोट्यात झालेल्या कपातीवर विश्वास नाही. परिणामी दुकानदारांवर काळा बाजार केल्याचा आरोप होत आहे. याउलट एपीएल धारक धान्य पुरवठा कधी करणार असा सवाल वारंवार विचारत आहे. मात्र प्रशासनाकडून धान्य पुरवठा पुन्हा सुरू होण्याची कोणतीही लक्षणे दिसत नाही आहेत.
प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या कमिशनमध्ये वाढ करण्याची मागणी संघटनेने केली आहे. कारण एक दुकान चालवण्यासाठी किमान ५० हजार रुपये खर्च येत आहे. मात्र कमिशनरुपात मिळणारी रक्कम पाहता दुकानदारांना नफा तर दूरच मात्र स्वत:च्या खिशातील पैसे खर्च करावे लागत आहे. परिणामी तोट्यात असलेल्या दुकानदारांसमोर दुकान बंद करणे किंवा भ्रष्टाचार करणे हे दोनच पर्याय उरल्याचे संघटनेने स्पष्ट केले.
प्रत्येक दुकानात रेशनिंग कोट्याचा हिशेब ठेवण्यासाठी एक कारकून असतो. हा कारकून रेशनिंगचे वाटप करताना पावत्या तयार करण्यापासून दुकानातील मालाची नोंद ठेवण्याचे काम करतो. रेशनिंग वाटण्यासाठी एक मजूर आवश्यक असतो. दुकानाच्या भाड्यासह कारकून व मजूराच्या पगाराचा भार हा दुकानचालकावर असतो. शिवाय वीजबिल व नोंद ठेवण्यास आवश्यक नोंदवही, पेन आणि इतर साहित्यासह वीजबिलाचा खर्चही दुकानदाराच्या माथी मारला जातो.