नागपूरमध्ये बार असोसिएशनच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांत हाणामारी!
By Admin | Updated: November 22, 2014 03:06 IST2014-11-22T03:06:53+5:302014-11-22T03:06:53+5:30
नागपूर जिल्हा बार असोसिएशनच्या (डीबीए) शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत नवीन सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्यावरून पदाधिकाऱ्यांमध्येच जोरदार हाणामारी झाली़

नागपूरमध्ये बार असोसिएशनच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांत हाणामारी!
नागपूर : नागपूर जिल्हा बार असोसिएशनच्या (डीबीए) शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत नवीन सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्यावरून पदाधिकाऱ्यांमध्येच जोरदार हाणामारी झाली़ यात सरचिटणीस मनोज साबळे जखमी झाले. ही घटना दुपारी ३च्या सुमारास घडली. दरम्यान, साबळे यांनी सदर पोलीस ठाण्यात डीबीएचे अध्यक्ष सुदीप जयस्वाल आणि सहसचिव मनीष रणदिवे यांच्याविरुद्ध नोंदवलेली तक्रार आपसात समझोता झाल्याचे सांगून सायंकाळी मागे घेतली.
१७ आॅक्टोबर रोजी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत अध्यक्ष सुदीप जयस्वाल यांनी २१ नोव्हेंबर २०१३नंतरच्या नवीन सदस्यांना निवडणुकीत मतदानाचा अधिकार न देण्याबाबतचा प्रस्ताव आणला होता. याला तिघांनी विरोध केला होता; तर १० सदस्यांनी समर्थन दिले होते. त्यामुळे हा प्रस्ताव पारित झाला होता. निवडणूक समितीने मात्र हा प्रस्ताव नामंजूर करून सर्वसाधारण सभेने हा प्रस्ताव पारित करावा, त्याला आपण मंजुरी देऊ, असे म्हटले होते. नवीन सदस्यांचा हा प्रस्ताव पारित करण्याच्या संदर्भात शुक्रवारी दुपारी २ वाजता ही सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली.
सरचिटणीस मनोज साबळे यांनी नवीन सदस्यांना मतदानाचा अधिकार द्यायचा आणि १९ डिसेंबर २०१४ रोजी मतदान घ्यायचे, असे म्हटले. त्यावरून सुदीप जयस्वाल संतप्त झाले. तेव्हा पुन्हा साबळे यांनी तुमची दादागिरी चालणार नाही, असे म्हटले. नेमक्या याच प्रकाराने सभेला हिंसक वळण लागले. माईक हिसकावण्याचा प्रकार होऊन जयस्वाल हे साबळे यांना मारहाण करण्यास पुढे आले. त्याच वेळी रणदिवे हे मध्ये पडले. साबळे यांची बुक्की रणदिवे यांना लागताच ते चिडले. त्यांनी हातातील कडे साबळे यांच्या कपाळावर मारल्याने त्यांना दुखापत झाली़ (प्रतिनिधी)