शहीद जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

By Admin | Updated: September 17, 2014 00:58 IST2014-09-17T00:58:07+5:302014-09-17T00:58:07+5:30

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात येणाऱ्या येरकड पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील मुख्य रस्त्यावर माओवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात राज्य राखीव पोलीस दलातील जवान चेतन विनायक साळवे

Official so-called funeral of martyr jawans | शहीद जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शहीद जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

गोंडखैरीत उसळली गर्दी : तीन राऊंड फायर करून दिली सलामी
कळमेश्वर : गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात येणाऱ्या येरकड पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील मुख्य रस्त्यावर माओवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात राज्य राखीव पोलीस दलातील जवान चेतन विनायक साळवे (२७) हा शहीद झाला. त्याच्या पार्थिवावर गोंडखैरी या मूळ गावी मंगळवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अंत्यदर्शन घेण्यासाठी परिसरातील नागरिकांची गर्दी उसळली होती.
चेतनचे पार्थिव दुपारी २.३० वाजताच्या सुमारास राज्य राखीव पोलीस दलाच्या वाहनात गोंडखैरी येथे आणले. पार्थिव काही काळ चेतनच्या घरी ठेवले होते. चेतनचे पार्थिव पाहताच आईवडिलांसह घरच्या मंडळींनी टाहो फोडला. यावेळी पोलीस अधिकारी व जवांनासह हजारो नागरिकांनी अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली वाहिली.
दुपारी ३.१५ वाजताच्या सुमारास अंत्ययात्रेला सुरुवात झाली. सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास त्याच्या पार्थिवावर स्थानिक स्मशानभूमीत शासकीस इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी राज्य राज्य राखीव दलाच्या २१ जवानांच्या तुकडीने हवेत तीन राऊंड फायर करून सलामी दिली. ‘चेतन साळवे अमर रहे’ने आसमंत निनादला होता.
नागपूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम, पोलीस महानिरीक्षक (राज्य राखीव पोलीस दल) डी. रामानंद, पोलीस आयुक्त के.के. पाठक, डी. बी. ईखनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी मोरेश्वर आत्राम, जावेद अख्तर, सोनटक्के, बलवंत, सुरजुसे, गौरखेडे, पराते, सेलुटकर, कळमेश्वरचे ठाणेदार रवींद्र गायकवाड यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
चेतन विनायक साळवे याचे इयत्ता चौथी ते १० वीपर्यंतचे शिक्षण गोंडखैरी येथील नवभारत विद्यालयात झाले. त्याच्या वडिलाचे मूळ गाव सावनेर तालुक्यातील कोच्छी असून, ते १५ वर्षांपूूर्वी गोंडखैरी येथे स्थायिक झाले. त्याने ११ व १२ वीपर्यंतचे शिक्षण नागपूर येथे पूर्ण केले. तो चांगला बॉक्सर असून, त्याने राष्ट्रीय पातळीवर विजेतेपद मिळविले होते. सन २०११ मध्ये त्याची राज्य राखीव पोलीस दलात कॉन्स्टेबलपदी निवड करण्यात आली. गेल्या सहा महिन्यांपूर्वी तो गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात कर्तव्यावर होता. दोन महिन्यांपासून तो गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात येणाऱ्या येरकड पोलीस मदत केंद्रात कार्यरत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ असा आप्तपरिवार आहे.

Web Title: Official so-called funeral of martyr jawans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.