एसटी प्रवाशांची ‘अधिकृत’ लूट
By Admin | Updated: July 10, 2014 02:35 IST2014-07-10T02:35:15+5:302014-07-10T02:35:15+5:30
एसटी चालक-वाहकांकडून स्थानकांवर थांबा न देता खाजगी हॉटेलवर थांबा देण्यात येत असल्यामुळे प्रवाशांच्या खिशाला मोठी कात्री लागत आहे.

एसटी प्रवाशांची ‘अधिकृत’ लूट
सुशांत मोरे - मुंबई
एसटी चालक-वाहकांकडून स्थानकांवर थांबा न देता खाजगी हॉटेलवर थांबा देण्यात येत असल्यामुळे प्रवाशांच्या खिशाला मोठी कात्री लागत आहे. वर्षानुवर्षे प्रवाशांकडून त्याबाबतच्या अनेक तक्रारी केल्यानंतरही ही लूट थांबत नव्हती. मात्र यावर तोडगा न काढता उलट खाजगी हॉटेल आणि मॉटेलवर यापुढे अधिकृत थांबा देण्याचा निर्णयच एसटी महामंडळाने घेतला. यासाठी महामंडळाकडून निविदा प्रक्रियेची जाहिरातही काढण्यात येत आहे. या निर्णयामुळे प्रवाशांची मात्र ‘अधिकृत’ लूट होणार आहे.
एसटी महामंडळाचा पसारा राज्यभर पसरला असून, वर्षाला 72 लाख प्रवासी त्याचा लाभ घेतात. मात्र एसटी गाडय़ांचे नसलेले नियोजन, न मिळणा:या सुविधा इत्यादी कारणांमुळे महामंडळाचे प्रवासी आणि उत्पन्न कमी होत आहे. त्यामुळे उत्पन्न आणि प्रवासी वाढवण्यासाठी महामंडळाकडून अनेक प्रयत्न केले जात आहे.
त्याचाच एक भाग म्हणून महामंडळाने खाजगी हॉटेल आणि मॉटेलवर एसटी बस गाडय़ांना थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे लांब पल्ल्याच्या मार्गावर किंवा जवळच्या मार्गावर धावणा:या एसटी बसेस स्वत:चे स्थानक सोडून खाजगी हॉटेलवर थांबतात आणि त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला मोठी कात्री लागते, अशा अनेक तक्रारी महामंडळाकडे येत आहेत.
मुंबई ते पुणो एक्स्प्रेस मार्गावर तर धावणा:या एसी शिवनेरी बसेसना खाजगी हॉटेलवर थांबा देण्यात येत असल्याने प्रवासी आणि
चालक-वाहकांमध्ये वादही झाले आहेत. या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करत महामंडळाने खाजगी हॉटेल आणि मॉटेलवर थांबा देण्याचा अजब निर्णय घेतला आहे. काही विभागाकडून निविदा प्रक्रियेची जाहिरातही काढण्यात आली आहे.
मुंबई-पुणो-मुंबई एक्स्प्रेस मार्गावरील एसटी बसेसना थांबा देण्यासंदर्भात निविदा जाहिरातही काढली आहे.
महामंडळाला हॉटेल चालकाकडून एका बसमागे ठरावीक रक्कम मिळणार आहे. त्यामुळे उत्पन्न होईल, असा उद्देश आहे.
राज्यातील ज्या मार्गावर हॉटेलवर थांबा देण्याची गरज आहे त्या ठिकाणी थांबा देण्यात येणार आहे. यासाठी निविदा प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. यामागे महामंडळाचे उत्पन्न वाढविण्याचे उद्दिष्ट असल्याचे वाहतूक विभाग महाव्यवस्थापक सूर्यकांत अंबाडेकर यांनी सांगितले.
साधारण पाच वर्षापूर्वी मुंबई-पुणो एक्स्प्रेस वेवर एसटीच्या शिवनेरी बसेसना खाजगी हॉटेलवर थांबे देण्यात येत होते. एका बसमागे ठरावीक रक्कम महामंडळाला अदा करण्यात येत होती. मात्र हा मार्ग पाहता प्रवाशांना खानपाण सेवेसाठी दुसरा पर्याय नसल्याने हॉटेलचालकांनी अशी सेवा न देण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर हॉटेलचालकांनी प्रवाशांची लूट सुरू केली.
महत्त्वाची बाब म्हणजे राज्यातील काही मार्गावर खाजगी हॉटेलवर अधिकृत थांबे यापूर्वी देण्यात आल्याचे अंबाडेकर यांनी सांगितले. पण असे अधिकृत थांबे कोणाच्या नजरेस कसे आले नाहीत, असे विचारले असता त्यांनी आपण पंढरपूरला आहोत, असे सांगून उत्तर देणो टाळले.
एसटीवाहक आणि चालकांना मोफत जेवण तसेच अन्य काही आर्थिक सुविधा मिळत असल्यानेच असे थांबे दिले जातात.